Join us

RBI Policy: रेपो दर जैसे थे, महागाईदरम्यान सामान्यांना रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा एकदा दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 10:02 AM

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णयाची घोषणा आज करण्यात आली.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णयाची घोषणा आज करण्यात आली. कर्जाचे मासिक हप्ते वाढणार की, आहे तसेच कायम राहणार असे प्रश्न अनेकांच्या मनात होते. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मात्र सामान्यांना दिलासा देत रेपो दर जैसे थे ठेवल्याची घोषणा केली. पतधोरण समितीच्या सर्व सदस्यांनी दर स्थिर ठेवण्याच्या बाजूनं आपलं मत दिल्याची माहिती यावेळी शक्तिकांत दास यांनी दिली. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात महागाई कमी होण्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली.एमपीसी बैठकीला बुधवारी प्रारंभ झाला होता.  रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत होऊ शकतो असं मत यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं. ऑगस्टमधील बैठक आणि आताची बैठक यांच्या मधल्या काळात महागाई वाढली आहे. वाढही मजबूत आहे. जागतिक मानके थोडेसे प्रतिकूल आहेत. त्यामुळे अमेरिकी फेडरल रिझर्व्ह आपला आक्रमक पवित्रा कायम राखून आहे. मात्र, ऑगस्टनंतर कृषी उत्पादनाच्या किमती कमी झाल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.काय म्हणाले गव्हर्नर?समितीतील सर्व सदस्यांनी रेपो दर स्थिर ठेवण्याच्या बाजूनं मत व्यक्त केलं आहे. सप्टेंबर महिन्यात महागाई कमी होण्याची शक्यता दास यांनी यावेळी व्यक्त केली. वाढता महागाई दर हा अर्थव्यवस्थेसाठी धोका असल्याचं ते यावेळी म्हणाले. तसंच रेपो दरातील वाढीचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. औद्योगिक क्षेत्रात दुसऱ्या तिमाहीत रिकव्हरी झाली आहे. बांधकाम उपक्रम मजबूत आहेत. सरकारी कॅपेक्स सपोर्टमुळे गुंतवणुकीची भावना कायम असल्याचंही दास यावेळी म्हणाले. कठीण आर्थिक परिस्थिती आणि भू-राजकीय संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी आहे. दरांवर ट्रान्समिशनचा परिणाम अद्याप दिसण अद्याप बाकी असल्याचं त्यांनी नमूद केलं.महागाईबाबत चिंता कायममहागाईवर लक्ष केंद्रित केलं आहे. देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर महागाईची चिंता अजूनही कायम असल्याचे ते म्हणाले. येत्या काही दिवसांत महागाई कमी होण्याची शक्यता आहे. डाळींची लागवड कमी झाल्याने महागाईचा धोका वाढला आहे. आर्थिक वर्ष २४ च्या चौथ्या तिमाहीत किरकोळ महागाई ५.२ टक्क्यांवर अपरिवर्तित असण्याचा अंदाज आहे. तर आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत रिटेल महागाई दर ५.२ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

"सर्व बाबी लक्षात घेता, चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी वास्तविक जीडीपी वाढ ६.५ टक्के राहिल असा अंदाज आहे. पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वास्तविक जीडीपी वाढ अंदाजे ६.६ टक्के राहू शकते असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दास