नवी दिल्ली: आगामी काही दिवसांतच Air India ची कमान TATA ग्रुपकडे देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. मात्र, कोट्यवधी रुपयांच्या कर्जात बुडालेल्या Air India ला नवसंजीवनी देण्यासाठी टाटा सन्स आता कंबर कसून तयारीला लागणार असल्याचे सांगितले जात आहे. अनेक वर्षांनी घरवापसी झालेल्या एअर इंडियासाठीटाटा समूह कोणताही रिस्क घेऊ इच्छित नाही, असे म्हटले जात आहे.
एअर इंडियाची जबाबदारी सोपवण्यासाठी टाटा सन्सकडून काही परदेशातील सीईओंची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. सदर व्यक्ती एअर इंडियासाठी मॅनेजमेंट टीम निवडेल. याशिवाय एअर इंडियाच्या ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठीही नवीन टीम तयार करण्यात येणार आहे. आताच्या घडीला एअर इंडियाच्या नवीन संचालक मंडळासाठी नावे निश्चित करण्यात येत आहेत, अशी माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. अलीकडेच टाटाकडून विद्यमान संचालकीय मंडळापैकी काही जणांचे राजीनामे मागण्यात आले होते.
नवीन वर्षात टाटाकडे एअर इंडियाची कमान?
जानेवारी २०२२ मध्ये एअर इंडियाचे टाटाकडे होणारे हस्तांतरण पूर्ण होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. एअर इंडियाच्या संचालक मंडळावर सात सदस्य आहेत. त्यात अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, चार कार्यकारी संचालक आणि सरकारनियुक्त दोन संचालकांचा समावेश आहे. विद्यमान संचालक मंडळाने राजीनामे दिल्यानंतर टाटा समूहाकडून नवीन संचालक मंडळाची स्थापना केली जाणार आहे. त्यानंतर २३ जानेवारीपासून ते एअर इंडियाचे संचालन स्वतःच्या हाती घेतील. त्यामुळे हस्तांतरणाआधी विद्यमान संचालक मंडळाने राजीनामे द्यावेत, असे निर्देश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत. टाटा सन्सचे चेअरमन सर्व ऑपरेटिंग कंपन्यांचे चेअरमन असतात. मात्र, त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
Air India चे विलिनीकरण करणार?
TATA ग्रुपची टाटा सन्स कंपनी एअर इंडियाचे पूर्ण संचालन करणार आहे. मात्र, एअर इंडियाचे संचालन सोपे नसेल, असे सांगितले जात आहे. टाटा एअर एशिया इंडियामध्ये एअर इंडिया एक्स्प्रेसचे विलिनीकरण करून एकच कंपनी स्थापन करण्याच्या विचारात आहे. एअर एशिया इंडियाचे ८४ टक्के हिस्सा असल्यामुळे एअर इंडियाचे विलिनीकरण करून एकच कंपनी स्थापन करण्याचा अधिकार टाटाला प्राप्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टाटाला एअर एशिया इंडिया आणि एअर इंडियाचे विलिनीकरण करणे अवघड जाणार नाही. यामुळे टाटा सन्सला एकाच कंपनीचे संचालन करावे लागेल. यानंतर पायाभूत सुविधांचा विकास, विस्तार करणे सुलभ होऊ शकणार आहे.
दरम्यान, एअर इंडियावर ६१ हजार ५६२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. यापैकी ७५ टक्के कर्ज टाटा समूहाकडे हस्तांतरण करण्यापूर्वी केंद्र सरकारच्या तिजोरीतून चुकते करण्यात येणार आहे. उर्वरित कर्ज टाटा समूह फेडणार आहे. सध्या एअर इंडियाकडे ५८ एअरबस, A320 फॅमिली विमाने, १४ बोइंग 777, २२ B787 ड्रीमलाइनर आणि AI एक्सप्रेसची २४ B737 एअरवर्थ असा विमानांचा भरगच्च ताफा आहे. हा सर्व ताफा टाटा सन्सला मिळणार आहे.