नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर तब्बल पावणे दोन वर्षांनी बँकेत परत आलेल्या चलनातून बाद झालेल्या नोटांचा नेमका आकडा समोर आला आहे. या आकडेवारीनुसार नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर 500 आणि एक हजार रुपयांच्या सुमारे 15 लाख 44 हजार कोटी रुपये मूल्याच्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यापैकी तब्बल 15 लाख 31 हजार कोटी रुपये किमतीच्या 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा परत बँकेत आल्या आहेत. तर केवळ 13 हजार कोटी रुपयांच्या नोटा बँकेत आलेल्या नाहीत.
Annual Report for the year 2017-18https://t.co/iY6XXsMsqM
— ReserveBankOfIndia (@RBI) August 29, 2018
रिझर्व्ह बँकेने आपला 2017-18 चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये नोटाबंदीच्या घोषणेवेळी चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटांपैकी 99.30 टक्के नोटा परत बँकेत आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची ऐतिहासिक घोषणा केली होती. त्यानंतर देशभरात अभूतपूर्व चलनटंचाई होऊन जुन्या नोटा बदलवून घेण्यासाठी बँकांसमोर रांगा लागल्या होत्या. नोटाबंदीमुळे मोठ्या प्रणाणात काळा पैसा बँकेत परत येणार नाही, असा दावा करण्यात येत होता. मात्र तब्बल 99 टक्क्यांहून अधिक नोटा परत बँकेत आल्याने नोटाबंदीच्या निर्णयाचा नेमका फायदा काय झाला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात आरबीआयने देशाची आर्थिक स्थिती सुधारल्याचा तसेच देशातील गुंतवणूक आणि उत्पादन वाढल्याचा दावा केला आहे. तसेच गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी महागाईसुद्धा काही प्रमाणात कमी झाल्याचे आरबीआयने या अहवालात म्हटले आहे.
RBI Annual Report 2017-18 states, "Domestic financial markets were broadly stable,with rallies in equity markets&intermittent corrections, hardening bond yields,the rupee trading with a generally appreciating bias except towards close of the yr&le liquidity in money markets"
— ANI (@ANI) August 29, 2018