शिमला - केंद्रीय बटाटा अनुसंधान केंद्र (सीपीआरआय) शिमला येथील शास्त्रज्ञांनी चक्क बटाट्यापासून जिलेबी बनवली आहे. आत्तापर्यंत आपण बटाट्याचे चीप्स, फ्रेंच फ्राय, कुकीज यांसारखे पदार्थ खात होतो. मात्र, आता आपल्याला बटाट्यांपासून बनविण्यात आलेल्या जिलेबीचाही आस्वाद घेता येणार आहे. विशेष म्हणजे ही जिलेबी तब्बल 8 महिन्यांपर्यंत वापरात येऊ शकते, तोपर्यंत तिची चव बिघडणार नाही.
सीपीआरआयने देशात उत्पादित होणाऱ्या बटाट्याच्या एका विशिष्ट प्रजातीपासून जिलेबी बनविण्याचा फंडा तयार केला आहे. मैद्याची जिलेबी जास्त दिवस सुरक्षित किंवा वापरात येऊ शकत नाही. त्यामुळे, 24 तासांतच ती जिलेबी वापरात आणण्याचा सल्ला दिला जातो. अन्यथा, मैद्याच्या जिलेबीची चव बिघडते. त्याचा तुमच्या शरिरावरही परिणाम होतो. मात्र, आता बटाट्यांपासून बनविण्यात आलेल्या जिलेबीवर हा परिणाम होत नाही. या जिलेबीला 8 महिन्यांपर्यंत सुरक्षित ठेवले जाते. याच्या चवीत आणि कुरकुरीतपणामध्येही फरक पडत नाही.
सीपीआरआयच्या वैज्ञानिकांनी बटाट्यांपासून जिलेबीचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे या फॉर्म्युल्याचे पेटेंटंही तयार केले. आता, हे पेटेंट विकून संस्थेला मोठा आर्थिक लाभही होऊ शकतो. जिलेबीच्या विक्रीसाठी नामवंत कंपन्यांसोबत करार करण्यात आला आहे. आयटीसीसारख्या नामवंत कंपन्यांसोबत बटाट्याच्या जिलेंबीसाठी चर्चा सुरू आहे. कारण, डब्बा बंद जिलेंबी मार्केटमध्ये येईल.
संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. अरविंद जयस्वाल यांनी सांगितले की, बटाट्यांची जिलेबी बनविण्यासाठी बटाटे हे सालासह वापरले जातात. कारण, सालट्यांध्ये अधिक फायबर असते. तसेच, जिलेंबीमध्ये जास्त प्रमाणात कुरकुरापण आणला जातो. ग्राहकांना पाक तयार करुनच ही जिलेबी वापरात येणार आहे, त्यामुळे कंपन्यांना पाकासह बंद डब्ब्यात ही जिलेबी विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याचं सांगण्यात येत आहे.