Join us

रिझर्व्ह बँकेने केली विक्रमी सोने खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 5:40 AM

डॉलरसमोर रुपया सातत्याने घसरत असल्याने बाजारात मंदी असताना रिझर्व्ह बँकेने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत १४८.४० टन इतक्या सोन्याची विक्रमी खरेदी केली.

मुंबई : डॉलरसमोर रुपया सातत्याने घसरत असल्याने बाजारात मंदी असताना रिझर्व्ह बँकेने जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत १४८.४० टन इतक्या सोन्याची विक्रमी खरेदी केली. तीन महिन्यांच्या कालावधीतील बँकेची २०१५ नंतर ही सर्वाधिक खरेदी आहे. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलने ही माहिती दिली.कौन्सिलच्या सोमसुंदरम यांनी सांगितले की, भारतासह बहुतांश विकसनशील देशांमधील प्रधान बँकांनी डॉलरकेंद्रित अर्थव्यवस्थेवरील अवलंबित्व कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात आर्थिक मंदी निर्माण झाल्यास डॉलर विक्रीऐवजी सोने विक्रीतून पैसा उभा करण्याची सोय बँकांनी केली आहे. या सोने खरेदीत जुलै-सप्टेंबर २०१७ च्या तुलनेत यंदा २२ टक्के वाढ झाली आहे. रशिया, कझाकिस्तान, तुर्कस्थानमधील बँकांनीही मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली आहे.जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत जगभरात ३८०९ टन सोन्याची विक्री झाली. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत २.५१ टक्के अधिक आहे. दागिन्यांच्या मागणीत चांगली वाढ झाली. पण भांडवली बाजाराशी संबंधित ‘ईटीएफ’ द्वारे होणाऱ्या सोने गुंतवणुकीत जवळपास २१ टक्के घट झाली. सोमसुंदरम यांनी सांगितले की, जुलै ते सप्टेंबर २०१७ च्या तुलनेत यंदा भारतात सोन्याची विक्री १० टक्के वाढली. पण जानेवारी ते सप्टेंबर या सहा महिन्यांचा विचार केल्यास मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा विक्री १ टक्का घटली आहे.

टॅग्स :सोनंभारतीय रिझर्व्ह बँक