अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मर्या, छत्रपती संभाजीनगर बँकेकडे पुरेसं भांडवल व उत्पन्नाची शक्यता नसल्यानं रिझर्व्ह बँकेनं बँकेचा परवाना रद्द केला आहे. रिझर्व्ह बँकेनं (RBI) यासंदर्भात एक निवेदन जारी केलंय.
मंगळवारी (२२ एप्रिल २०२५) व्यवहार बंद झाल्यापासून बँक बँकिंग व्यवसाय करणं बंद करेल, असं त्यांनी यात नमूद केलंय. महाराष्ट्र सहकारी संस्था निबंधकांना बँक बरखास्त करून बँकेसाठी लिक्विडेटर नेमण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
५ लाखांपर्यंत क्लेम करता येणार
लिक्विडेशननंतर प्रत्येक ठेवीदाराला डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून (डीआयसीसीसी) पाच लाख रुपयांच्या आर्थिक मर्यादेपर्यंतच्या ठेवीच्या विमा दाव्याची रक्कम मिळू शकेल. बँकेनं सादर केलेल्या आकडेवारीनुसार ९१.५५ टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम डीआयसीसीकडून मिळण्याचा अधिकार आहे. ३ एप्रिल २०२५ पर्यंत डीआयसीसीनं एकूण विमा ठेवींमधून २७५.२२ कोटी रुपये भरले आहेत.
ठेवीदारांच्या हिताला घातक
अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यामागचं कारण सांगताना बँक सध्याच्या ठेवीदारांना सध्याच्या आर्थिक स्थितीनुसार पूर्ण पैसे देण्यास असमर्थ ठरेल आणि यापुढे बँकेला बँकिंग व्यवसाय करण्यास परवानगी दिल्यास सार्वजनिक हितावर विपरीत परिणाम होईल, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. त्याचबरोबर बँक सुरू ठेवणं ठेवीदारांच्या हितासाठी घातक असल्याचंही सांगण्यात आलं.
परवाना रद्द झाल्यानं अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 'बँकिंग'चा व्यवसाय करण्यास तात्काळ बंदी घालण्यात आली असून, त्यात ठेवी स्वीकारणं आणि ठेवींची परतफेड करणं यांचा समावेश आहे.