Join us

रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 5:49 AM

भारतीय रिझर्व्ह बँकेचे एक डेप्युटी गव्हर्नर डॉ. विरल आचार्य यांनी मुदत संपण्याच्या सहा महिने आधीच पद सोडण्याचे ठरविले आहे.

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेचे एक डेप्युटी गव्हर्नर डॉ. विरल आचार्य यांनी मुदत संपण्याच्या सहा महिने आधीच पद सोडण्याचे ठरविले आहे. आचार्य यांची मुदत २० जानेवारी, २०२० रोजी संपणार होती. अवघ्या ४३ वर्षांचे डॉ. आचार्य हे रिझर्व्ह बँकेच्या इतिहासातील सर्वात तरुण डेप्युटी गव्हर्नर आहेत.आचार्य यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिल्यानंतर रिझर्व्ह बँकेनेही दुपारी त्यास अधिकृत दुजोरा दिला. रिझर्व्ह बँकेने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, काही अपरिहार्य व्यक्तिगत कारणांमुळे आपल्याला २३ जुलैच्या पुढे डेप्युटी गव्हर्नर पदावर राहता येणार नाही, असे डॉ.आचार्य यांनी काही आठवड्यांपूर्वी पत्र लिहून कळविले. त्या अनुषंगाने पुढे काय करायचे, याचा निर्र्णय सक्षम प्राधिकारी योग्य वेळी घेतील.डॉ.आचार्य न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न स्कूल आॅफ बिझिनेसमधून रिझर्व्ह बँकेत आले होते. डॉ.उर्जित पटेल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना डॉ. आचार्य त्यांचे निकटवर्ती मानले जायचे. जाहीर कार्यक्रमांमध्ये व संचालक मंडळांच्या बैठकांमध्ये डॉ. आचार्य हे डॉ. पटेल यांच्याहूनही सरकारवर अधिक कडक टीका करत होते, त्यामुळे डॉ. आचार्य यांच्या पाठोपाठ तेही रिझर्व्ह बँकेतून बाहेर पडतील, असे वाटले होते, परंतु ते पदावर राहिल्याने आता ते स्थिरावले असे वाटत असतानाच त्यांनी पदत्याग करण्याचे ठरविले आहे.

रिझर्व्ह बँक सोडून डॉ. आचार्य पुन्हा अध्यापनाकडे वळतील, असे मानले जाते. अमेरिकेत विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष जुलै-आॅगस्टपासून सुरू होत असल्याने डॉ. आचार्य जुलैमध्ये पद सोडणार असल्याचे कळते. गेल्या वर्षी २६ आॅक्टोबर रोजी मुंबईत केलेल्या ए.डी. श्रॉफ स्मृती व्याख्यानाने डॉ. आचार्य विशेष चर्चेत आले होते. जे सरकार मध्यवर्ती बँकेच्या स्वायत्ततेस किंमत देत नाही त्या सरकारला वित्तीय बाजारांकडून दणका मिळणे अपरिहार्य आहे, असे त्यांनी त्या व्याख्यानात बजावले होते.अर्थतज्ज्ञ म्हणून होती नेमणूकरिझर्व्ह बँकेच्या चार डेप्युटी गव्हर्नरपैकी दोन रिझर्व्ह बँकेतून, एक व्यापारी बँकिंग क्षेत्रातून तर एक अर्थतज्ज्ञ निवडला जातो. डॉ. आचार्य यांची नेमणूक अर्थतज्ज्ञ म्हणून झाली होती. एन. एस. विश्वनाथन व बी. पी. कानुंगो हे दोन डेप्युटी गव्हर्नर बँकेतूनच नेमले गेले आहेत, तर महेश कुमार जैन हे बँकिंग क्षेत्रातून आले. यापैकी विश्वनाथन यांची मुदतही पुढील महिन्यात संपत आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँककेंद्र सरकार