Join us  

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची घोषणा आॅगस्टच्या मध्यात

By admin | Published: July 27, 2016 12:44 AM

रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचे पतधोरण येत्या ९ आॅगस्ट रोजी जाहीर केल्यानंतरच सरकार त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड जाहीर

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचे पतधोरण येत्या ९ आॅगस्ट रोजी जाहीर केल्यानंतरच सरकार त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड जाहीर करणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून समजते.डॉ. राजन यांची तीन वर्षांची मुदत सप्टेंबरमध्ये संपत आहे आणि त्यानंतर पुन्हा गव्हर्नर होण्यात आपल्याला स्वारस्य नाही, हे त्यांनी याआधीच जाहीर केले आहे. आगामी तिमाहीचे पतधोरण ठरविण्यासाठी रिझर्व्ह बँकेची बैठक ९ आॅगस्ट रोजी व्हायची आहे. गव्हर्नर या नात्याने डॉ. राजन यांची ती शेवटची बैठक असेल.सूत्रांनुसार, या बैठकीआधीच नव्या गव्हर्नरची निवड जाहीर केली तर पुढील दीड-दोन महिने डॉ. राजन यांची अवस्था नावापुरता पदावर असलेले गव्हर्नर अशी होईल. तसे होऊ नये यासाठी ज्याला पुढील गव्हर्नर म्हणून नेमायचे त्याला आधी रिझर्व्ह बँकेत एखाद्या पदावर हंगामी पदावर नेमायचे व डॉ. राजन यांच्या निवृत्तीच्या आधी काही दिवस नवी नियुक्ती जाहीर करून त्या व्यक्तीला डॉ. राजन यांचा उत्तराधिकारी म्हणून औपचारिक सूत्रे हाती द्यायची, असा सरकारचा विचार सुरू आहे.असे केल्याने डॉ. राजन यांना पूर्ण मुदतीपर्यंत कोणत्याही संकोचाविना गव्हर्नरपदी काम करता येईल व त्यांची जागा घेणाऱ्या नव्या व्यक्तीलाही रिझर्व्ह बँकेच्या कामाची महिना-दीड महिन्यात ओळख होईल, असा यामागचा विचार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.त्यामुळे डॉ. राजन यांचा उत्तराधिकारी निवडण्याची सध्या सुरू असलेली प्रक्रिया सरकार पार पाडेल, पण निवड केलेल्या व्यक्तीच्या नावाची घोषणा मात्र काहीशी लांबणीवर टाकली जाईल, असे या सूत्रांना वाटते. मात्र नवा गव्हर्नर पूर्ण पाच वर्षांच्या काळासाठी नेमण्याचाही सरकारचा विचार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.दरम्यान, गव्हर्नरपदासाठी ज्यांच्या नावांचा विचार सुरू आहे अशा संभाव्य उमेदवारांमध्ये कौशिक बसु यांचाही आता समावेश झाला असल्याचे माहीतगार सांगतात. बसु सध्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ आहेत. येत्या ३१ जुलै रोजी ते तेथून निवृत्त होत आहेत. मात्र बसु यांच्या नावाला सत्तावर्तुळात राजकीय विरोध होण्याचीही शक्यता आहे. कारण बसु आधीच्या काँग्रेस प्रणीत ‘संपुआ-१’ सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. शिवाय ज्या नोबेल पुरस्कार विजेत्या अमर्त्य सेन यांनी मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती त्यांचे बसु हे अर्थशास्त्रातील चेले मानले जातात.गव्हर्नरपदासाठी आधीपासून चर्चेत असलेल्या नावांमध्ये रिझर्व्ह बँकेचे एक विद्यमान डेप्युटी गव्हर्नर ऊर्जित पटेल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवरील भारताचे स्थायी संचालक सुबीर गोकर्ण व स्टेट बँकेच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालिका अरुंधती भट्टाचार्य यांचा समावेश आहे. माजी डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन यांचेही नाव काही काळ चर्चेत होते. परंतु मोहन अलीकडेच अमेरिकेतील येल विद्यापीठात नव्या पदावर रुजू झाले आहेत आणि त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होण्यास फारसे स्वारस्य नसल्याचे सूचित केल्याने त्यांचे नाव मागे पडल्याचेही सांगण्यात येते. (लोकमत न्यूज नेटवर्क)