Join us  

रिझर्व्ह बँकेने व्याजदराबाबत घेतला मोठा निर्णय, महागाई नियंत्रणाला देणार सर्वोच्च प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 9:18 AM

RBI News: द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना व्याजदरामध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचा अंदाज खरा ठरवत रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो दर ४ टक्क्यांवर, तर रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्क्यांवर ‘जैसे थे’ ठेवला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबतची घोषणा केली. 

मुंबई : द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना व्याजदरामध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचा अंदाज खरा ठरवत रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी रेपो दर ४ टक्क्यांवर, तर रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्क्यांवर ‘जैसे थे’ ठेवला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबतची घोषणा केली. दास यांनी सांगितले की, कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेतून अर्थव्यवस्था आता सावरत आहे. पुरवठा व मागणीतील बिघडलेला समतोल पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीत व्याजदरांत कोणताही बदल न करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने सर्वसंमतीने घेतला आहे. लसीकरण आणि धोरणात्मक पाठबळ तसेच निर्यातीतील सुधारणा यामुळे अर्थव्यवस्था सुधारत असल्याचाही त्यांनी स्पष्ट केले.महागाईबाबत रिझर्व्ह बँकेने चिंता व्यक्त केली आहे तसेच ग्रामीण भागातील मागणी वाढावी यासाठी अधिक प्रयत्न करण्यावर जोर दिला जात आहे. गव्हर्नर दास यांनी म्हटले की, मेमध्ये किरकोळ महागाईचा दर ६ टक्के राहिला. निर्धारित उद्दिष्टापेक्षा तो अधिक आहे. मागणीत सुधारणा होत असली तरी यासंबंधीची परिस्थिती सुधारताना दिसून येत नाही. ग्रामीण भागातील मागणीमुळे वस्तूपभोग वाढेल. त्याबरोबर शहरांतील मागणीत हळूहळू सुधारणा होईल, असे रिझर्व्ह बँकेला वाटते. ताज्या तिमाही निकालांत कंपन्या नफा कमावत असल्याचे आढळून आले आहे. आयटी कंपन्यांची कामगिरी अधिक चांगली राहिल्याचे रिझर्व्ह बँकेने नमूद केले आहे. चालू वित्त वर्षासाठी अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर अंदाज रिझर्व्ह बँकेने ९.५ टक्के असा कायम ठेवला आहे. वृद्धीदर जूनच्या तिमाहीत १८.५ टक्क्यांवरून वाढवून २१.४ टक्के करण्यात आला आहे. 

ऑगस्टमध्ये खरेदी करणार ५० हजार कोटींचे रोखे n ऑगस्टमध्ये दोन टप्प्यांत ५० हजार कोटी रुपयांची सरकारी रोखे खरेदी करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. जी-सॅप २.० उपक्रमांर्तगत दुय्यम बाजारातून म्हणजेच खुल्या बाजारातून ही खरेदी केली जाणार आहे. अर्थव्यवस्थेत भांडवल ओतण्याच्या उद्देशाने ही खरेदी केली जाणार आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. n रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सर्व यिल्ड आलेख तरल (लिक्विड) राहावेत, यासाठी जी-सॅप उपक्रम रिझर्व्ह बँकेकडून राबविला जात आहे. त्याअंतर्गत १२ ऑगस्ट आणि २६ ऑगस्ट २०२१ अशा दोन टप्प्यांत प्रत्येकी २५ हजार कोटी रुपयांचे सरकारी रोखे रिझर्व्ह बँक खरेदी करणार आहे. यापुढेही हा उपक्रम गरजेनुसार राबविला जाईल.  

नवीन कर्जे झाली २.१७ टक्के स्वस्तफेब्रुवारी २०१९मध्ये व्याजदर कमी व्हायला सुरवात झाल्यापासून नवीन कर्जाचे व्याज २.१७ टक्के कमी झाल्याचे दास यांनी स्पष्ट केले. नवीन घेतलेल्या कर्जासाठी आता द्यावे लागणारे व्याज १.७० टक्के कमी लागत असल्याने ग्राहक समाधानी असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकिंग क्षेत्र