भारतीय रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank Of India) सोमवारी मुंबईत मुख्यालय असलेल्या रायगड सहकारी बँकेवर (Raigad Sahakari Bank) अनेक निर्बंध लादले असल्याची घोषणा केली. या निर्बंधांमध्ये ग्राहकांना पैसे काढण्यावर निर्बंध आणण्यात आले असून आता जास्तीतजास्त १५ हजार रूपयेच काढता येणार आहे. याचाच अर्थ ग्राहकांना आता त्यांच्या खात्यातून यापेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही. बँकेची आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेनं हा निर्णय घेतला आहे.
“एका ग्राहकाला एकूण १५ हजार रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्याची परवानगी देण्यात येणार नाही. त्यांची एकापेक्षा अधिक करंट अथवा सेव्हिंग खाती असली तरी अधिक रक्कम काढता येणार नाही,” असं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे. याशिवाय रिझर्व्ह बँकेनं नव्या कर्जांचं वाटप करण्यावरही निर्बंध घातले आहे.
“रायगज सहकारी बँकेला रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतंही कर्ज देण्याची, गुंतवणूक करण्याची आणि ग्रहकांकडून नव्यानं जमा रक्कम स्वीकारण्याची परवानगी नसेल,” असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. रायगड सरकारी बँकेवर हे निर्बंध पुढील सहा महिन्यांसाठी लागू असतील. दरम्यान, हे निर्बंध बँकेचा परवाना रद्द करण्याच्या रूपात नसतील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. बँक आपली आर्थिक परिस्थिती सुधरेपर्यंत निर्बंधांसह बँकिंग व्यवसाय सुरू ठेवेल, तसंच परिस्थितीनुरूप रिझर्व्ह बँक पुढे आपल्या निर्देशांमध्ये बदल करण्यावर विचार करू शकेल, असंही स्पष्ट करण्यात आलंय.
‘या’ बँकेला दंडदरम्यान, श्री छत्रपती राजर्षि शाहू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला ६ लाख रूपयांचा दंड ठोठावल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं एका निवेदनाद्वारे दिली. मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे.