नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने सुवर्णरोख्यांसाठी २६८४ रुपये प्रति १० ग्रॅम असे मूल्य निश्चित केले आहे. या रोख्यांसाठी ५ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरदरम्यान अर्ज स्वीकारले जाणार आहेत.भारतात ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर थेट सोने खरेदी केले जाते. त्याला पर्याय म्हणून सरकारतर्फे सुवर्णरोख्यांची योजना आणण्यात आली आहे. या योजनेतहत गुंतवणूकदारांना २.७५ टक्के व्याज मिळेल. गुंतवणूक २ ग्रॅमपासून ५५० ग्रॅम मूल्यांपर्यंत रोखे खरेदी करू शकतात. एका प्रसिद्धीपत्रकात रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, यावेळी सुवर्णरोख्यांचा दर २६८४ रुपये प्रति १० ग्रॅम ठेवण्यात आला आहे. २६ ते ३० आॅक्टोबर २०१५ दरम्यान ९९९ शुद्ध सोन्याचे भाव ध्यानात घेऊन ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’द्वारे प्रकाशित केलेल्या भावाच्या आधारे सुवर्णरोख्यांचा हा दर निश्चित करण्यात आला आहे. हे सुवर्णरोखे बँका आणि ठरवून दिलेल्या टपाल कार्यालयातून विकले जातील. २६ नोव्हेंबर रोजी हे रोखे जारी करण्यात येतील. त्यासाठी ५ ते २० नोव्हेंबरदरम्यान अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. हे रोखे निवासी भारतीय खरेदी करू शकतात. त्यात नागरिक, एकत्रित कुटुंब (एचयूएफ) न्यास, विद्यापीठ किंवा धार्मिक संस्था यांचा समावेश आहे.
रिझर्व्ह बँकेकडून सुवर्णरोख्याची किंमत निश्चित
By admin | Published: November 04, 2015 4:23 AM