नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करीत आहे, अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहे. मात्र, याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्टीकरण दिले असून या नोटाबंदीची शक्यता फेटाळून लावली आहे.
सध्या चलनातून नोटा बाद करण्याचा कोणताही विचार नाही. 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनात कायम असून त्या वैध राहतील, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. तसेच, याबाबत येणाऱ्या बातम्या पूर्णपणे दिशाभूल करणाऱ्या असून सरकारची अशी कोणतीही योजना नाही, असेही भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या मालिकांच्या नोटा चलनातून बाद होण्याबाबत आलेल्या बातम्या खोट्या असून आरबीआयकडे अशी कोणतीही योजना नाही, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
With regard to reports in certain sections of media on withdrawal of old series of ₹100, ₹10 & ₹5 banknotes from circulation in near future, it is clarified that such reports are incorrect.
— ReserveBankOfIndia (@RBI) January 25, 2021
दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक महाव्यवस्थापक बी. महेश यांनी दक्षिण कन्नड जिल्हास्तरीय सुरक्षा समिती आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत जुन्या नोटांबाबत विधान केले होते. "100, 10 आणि 5 रुपयांच्या; पण सध्या चलनात असलेल्या सर्व नोटा मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून चलनातून बाद करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये पुन्हा नोटबंदी होणार अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित झाल्या. यामुळे याबाबत गंभीर दखल घेत भारतीय रिझर्व्ह बँकेने आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
PIB कडून फॅक्ट चेक
याआधी 24 जानेवारीला पीआयबीने (प्रेस इन्फर्मेशन ब्यूरो) फॅक्ट चेकद्वारेही हे दावे फेटाळले आहेत. फॅक्ट चेकमध्ये असे आढळले की ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. अशा प्रकारचा दावा पूर्णपणे खोटा आहे.
तुमच्याजवळ असा मेसेज आला तर करू तुम्हीही शकता फॅक्ट चेक
जर आपल्याला कोणताही अशा प्रकारचा मेसेज आला असेल तो पीआयबीकडे फॅक्ट चेकसाठी https://factcheck.pib.gov.in/ किंवा व्हॉट्अॅप नंबर +918799711259 किंवा ईमेलः pibfactcheck@gmail.com वर पाठवू शकता. यासंबंधी माहिती पीआयबीची वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.