नवी दिल्ली : किरकोळ आणि घाऊक महागाईने आता वरच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून, आता व्याजदर कपातीचा रथ रोखला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे.आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या उर्वरित कालावधीसाठी व्याजदर जैसे थे राहू शकतात. रिझर्व्ह बँकेकडून तसा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, असा अंदाज कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेचे याबाबतचे पुढील धोरण ३-४ आॅक्टोबर रोजी ठरणार आहे.या अहवालानुसार, किरकोळ महागाई आणि ठोक महागाई दोन्हीत मोठे बदल झाले आहेत. किरकोळ महागाई मार्च २०१८ पर्यंत ४.७ टक्के आणि ठोक महागाई ३.६ टक्के राहू शकते. या अहवालात असेही म्हटले आहे की, सातव्या वेतन आयोगात घर भाडे, भत्ते शिफारशी लागू झाल्यानंतर, किरकोळ महागाईवर दबाव वाढू शकतो. रिझर्व्ह बँकेसाठी किरकोळ महागाई हा महत्त्वपूर्ण घटक आहे. या आधारे बँक व्याजदराबाबत आपले धोरण जाहीर करत असते.या अहवालानुसार, किरकोळ महागाई मार्च २०१८ पर्यंत ४.७ टक्के (घर भाडे भत्त्याशिवाय ४.३ टक्के) राहू शकते. उल्लेखनीय म्हणजे, किरकोळ महागाईचा दर आॅगस्टमध्ये वाढून पाच महिन्यांच्या उच्च स्तरावर ३.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. जुलैमध्ये हा दर २.३६ टक्के होता. ब्रोकरेज कंपनीच्या अंदाजानुसार, आरबीआय चालू आर्थिक वर्षासाठी उर्वरित कालावधीसाठी रेपो दर जशास तसा ठेऊ शकते, पण चांगल्या मान्सूनमुळे खाद्यवस्तूंची आवक वाढेल, महागाई आश्चर्यकारकपणे ४ टक्क्यांच्या खाली येईल, तेव्हा व्याजदरात कपातीबाबत विचार होऊ शकतो. रिझर्व्ह बँकेने आॅगस्टमध्ये महागाईचा धोका कमी झाल्याचा हवाला देत, रेपो दर ०.२५ टक्के कमी करून ६ टक्के केला होता.>असे आहेत सध्याचे व्याजदररिझर्व्ह बँकेचा रेपो रेट सद्या ६ टक्के असून, रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्के आहे. गत वर्षभरात रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये काही प्रमाणात कपात करण्यात आली. त्यामुळे अलीकडच्या काळात अनेक बँकांनी आपले व्याजदर कमी केले आहेत.प्रामुख्याने अनेक बँकांचे गृहकर्ज स्वस्त झाले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या एसबीआय बँकेचे होम लोनचे व्याजदर सद्या ८.५० किंवा त्यापेक्षा कमी आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे व्याजदर कपात थांबण्याची शक्यता ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:41 AM