Join us  

रेपो दर अर्धा टक्क्याने वाढला! कर्जे महागणार; EMI वाढणार, RBI चा सामान्यांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 10:46 AM

रेपो रेट वाढवल्याचा परिणाम म्हणजे बँक कर्जाच्या EMI मध्ये मोठी वाढ होऊ शकेल.

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आणखी कात्री लागण्याची शक्यता आहे. कारण, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण जाहीर केले आहे. यामध्ये मध्यवर्ती बँकेने ०.५० टक्क्यांनी रेपो रेट वाढवला आहे. यामुळे गृह कर्जापासून सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत. रेपो रेट वाढवल्याचा परिणाम म्हणजे कर्जाच्या EMI मध्येही मोठी वाढ होईल. महिनाभरात दुसऱ्यांदा व्याजदर वाढ झाल्याने कर्जदारांना जोरदार झटका दिला आहे. 

गेल्या महिन्यात बँकेने अचानक व्याजदर वाढवला होता. त्या पार्श्वभूमीवर गव्हर्नर शक्तिकांत दास कर्जदारांना धक्का देत रेपो वाढीची घोषणा केली. या दरवाढीनंतर रेपो दर ४.९० टक्के झाला आहे. स्टॅंडिंग डिपॉझिट फॅसिलीटी रेट ४.१५ टक्के झाला होता. बँक रेट ४.१५ टक्के आणि सीआरआर अर्धा टक्क्याने वाढून ४.५० टक्के झाला. 

रेपो दरात आणखी ०.४० टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज

रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले होते की, चलनवाढीचा दर ६ टक्क्यांच्या समाधानकारक पातळीवर आणण्याचा दबाव पाहता, पॉलिसी रेट वाढण्याची शक्यता वाढली आहे. रेपो दरात आणखी ०.४० टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज काही ब्रोकरेज संस्थांनी व्यक्त केला आहे. याशिवाय ऑगस्टच्या आढाव्यात ते ०.३५ टक्क्यांनी वाढू शकते. असे न झाल्यास आरबीआय पुढील आठवड्यात ०.५० टक्के आणि ऑगस्टमध्ये ०.२५ टक्के वाढ करण्याचे ठरवू शकते. 

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यास सर्वसामान्यांसाठी कर्ज महाग होईल कारण बँकांच्या कर्जाची किंमत वाढेल. रेपो रेट हा दर आहे ज्यावर बँका आरबीआयकडून पैसे घेतात. हा दर वाढल्यावर बँकांना जास्त दराने कर्ज मिळेल, त्यामुळे ते त्यांच्या ग्राहकांकडून जास्त दराने व्याजही घेतील. पतधोरण जाहीर होण्यापूर्वीच कॅनरा आणि HDFC बँकेने कर्जदारांना झटका दिला. एचडीएफसी बँकेने कर्जदर ०.३५ टक्क्यांनी वाढवला आहे. ७ जून २०२२ पासून नवीन कर्जदर लागू झाला आहे. या दरवाढीने कर्जाचा मासिक हप्ता वाढेल. त्याशिवाय गृह कर्ज, वाहन कर्ज तसेच वैयक्तिक कर्ज आणि इतर नवीन कर्ज जादा दराने घ्यावे लागणार आहे. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक