मुंबई : कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेले आर्थिक आव्हान पेलण्यास भारतीय रिझर्व्ह बँक तयार आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक हरत-हेची उपाययोजना करेल, असेही दास यांनी म्हटले आहे.
चीनमध्ये निर्माण झालेला कोरोना विषाणू ८० पेक्षा अधिक देशांत पसरला असून आतापर्यंत ३,३०० लोकांचा त्याने बळी घेतला आहे. कोरोनामुळे चीनमधील आर्थिक घडामोडी ठप्प झाल्या असून त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर दास यांनी वरील वक्तव्य केले आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका औद्योगिक कार्यक्रमात दास यांनी सांगितले की, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा मुकाबला करण्यास आम्ही सक्षम आहोत. गरज भासेल तेथे हस्तक्षेप करण्यास रिझर्व्ह बँक तयार आहे. संकटाचा सामना करण्यासाठी भारताकडे पुरेशी साधनेही आहेत. भारताचा विदेशी चलनाचा साठा मजबूत आहे.
दास म्हणाले की, कोरोनामुळे जागतिक पातळीवर गंगाजळीची समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. त्यावर मात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने समस्याविरहित चलन बदल व्यवस्था उपलब्ध करून द्यायला हवी.
कोरोना विषाणूच्या साथीमुळे जागतिक वृद्धी मंदावण्याची अपेक्षा आहे. जगातील सर्व केंद्रीय बँकांनी यावर समन्वयित पद्धतीने काम करण्याचा निर्धार केला आहे.
>भारतावर फार परिणाम नाही
दास यांनी म्हटले की, चीनवर अवलंबून असलेल्या क्षेत्रांवर साथीचा परिणाम होईल. पण त्याविरुद्ध आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. भारताची अर्थव्यवस्था जागतिक मूल्य साखळीशी फारशी समरूप झालेली नसल्याने भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा फार परिणाम होणार नाही.
‘कोरोना’चे आर्थिक आव्हान पेलण्यास रिझर्व्ह बँक तयार- शक्तिकांत दास
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक हरत-हेची उपाययोजना करेल, असेही दास यांनी म्हटले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 04:43 AM2020-03-07T04:43:09+5:302020-03-07T04:43:31+5:30