नवी दिल्ली : विकासाला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात करायला हवी होती, अशा शब्दांत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज आपली नाराजी बोलून दाखवत यापुढे ही बँक अनेक मुद्दे विचारात घेईल, अशी आशा व्यक्त केली.रिझर्व्ह बँकेने केंद्रात गेल्या मे महिन्यात नवे सरकार स्थापन झाल्यावर जाहीर केलेल्या तिच्या दोन आर्थिक धोरणांत व्याजाच्या दरात कोणताही बदल केला नाही. मी त्याच दिवशी (३ जून आणि ५ आॅगस्ट) निवेदन प्रसिद्धीस दिले होते व त्यात भूमिका पुरेशी स्पष्ट होती. व्याजदरात घट वा वाढ करायची की नाही याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घ्यायचा आहे व तो घेताना बँक वेगवेगळे मुद्दे विचारात घेईल याची मला खात्री आहे, असे जेटली यांनी सांगितले. रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळाच्या बैठकीत मार्गदर्शन केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.५ आॅगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेने आर्थिक धोरण जाहीर केल्यानंतर जेटली म्हणाले होते की, चलनवाढ ही नेमस्त असून ती तशीच सुरू आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजाचे धोरण ठरविताना चलनवाढ, वाढ व रोखतेच्या परिस्थितीचे परीक्षण केले पाहिजे, असे जेटली म्हणाले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात करायला हवी होती
By admin | Published: August 11, 2014 1:59 AM