Join us  

रिझर्व्ह बँक ईसीबी निकष शिथिल करणार

By admin | Published: September 23, 2015 10:02 PM

विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी रिझर्व्ह बँक लवकरच बाह्य व्यावसायिक कर्ज (ईसीबी) नियम शिथिल करणार आहे

नवी दिल्ली : विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी रिझर्व्ह बँक लवकरच बाह्य व्यावसायिक कर्ज (ईसीबी) नियम शिथिल करणार आहे. याबाबतचा मसुदा लवकर जारी केला जाईल, असे आर्थिक प्रकरणांचे सचिव शक्तिकांत दास यांनी आज सांगितले.ते म्हणाले की, याशिवाय सरकार विविध शर्ती आणि निर्बंध हटविण्याची योजनाही करीत आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणुकीसाठी भारत आकर्षण केंद्र बनेल.‘असोचेम’च्या एका कार्यक्रमात बोलताना दास म्हणाले की, आम्ही याबाबत रिझर्व्ह बँकेशी चर्चा करीत आहोत. यापूर्वीही चर्चा केली आहे. वित्तमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार लवकरच रिझर्व्ह बँक ईसीबी निकष शिथिल करणारा मसुदा तयार करील. याबाबत संबंधित पक्षांकडून टिपण मागवून ईसीबी निकषांना अंतिम स्वरूप दिले जाईल. बाहेरील स्थिती आणि वित्तीय स्थिरता ध्यानात घेऊन निकष उदार केले जातील.ईसीबीचा वित्तीय स्थैर्यावर परिणाम होतो. कारण त्यामुळे देशावर असलेले बाह्यकर्ज आणि भावी देणे यात वाढ होते. याबाबत टिपण देण्यासाठी संबंधित पक्षांना फार कमी वेळ दिला जाईल. काही गफलत होऊ नये व वित्तीय स्थितीला नुकसान पोहोचू न देता ईसीबी निकष उदार करण्याचे प्रयत्न केले जातील. हे निकष शिथिल केल्यास भारतातील कंपन्यांना आणखी निधी उपलब्ध होईल. थेट विदेशी गुंतवणुकीबाबत दास म्हणाले की, सरकार विदेशी गुंतवणूक व्यवस्था सुधारण्यासाठी विचार करीत आहे. नवीन विभाग उघडण्यात आले आहेत. ‘मेक इन इंडिया’चे धोरण राबविण्यासाठी हे उपाय योजण्यात येत असून, भारत जागतिक गुंतवणुकीचे केंद्र व्हावे, अशी त्यामागची भूमिका आहे.