नवी दिल्ली : पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी नियामकीय बदल करण्याचा पर्याय रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने खुला ठेवला आहे, असे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान यांनी दिले. भारत गुंतवणूक संमेलनात बोलताना खान यांनी सांगितले की, नियमांत परिस्थितीनुसार बदल करण्याचा पर्याय आम्ही खुला ठेवला आहे. कोणतीही गोष्ट कायमसाठी एक सारखी असत नाही. हीच बाब नियमांनाही लागू आहे. यासंबंधी करण्यात येत असलेल्या मागणीच्या बाबतीत आम्ही संवेदनशील आहोत. रिझर्व्ह बँकेने गेल्या काही महिन्यांत बाह्य वाणिज्यिक कर्जासंबंधी (ईसीबी) अनेक उपाययोजनांची घोषणा केली आहे. अंतिम उपयोगासंबंधी काही निर्बंधांबाबत ईसीबी नियमांत सूट देण्यात आली आहे. याशिवाय स्वायत्त आरोग्य निधी आणि निवृत्ती वेतन कोशाकडून कर्ज घेण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. देश-विदेशातील कोशांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.
नियामकीय बदलासाठी रिझर्व्ह बँकेचे पर्याय खुले
By admin | Published: February 06, 2016 2:59 AM