TIME 100 List : जगातील श्रीमंत लोकांची चर्चा नेहमीच होत असते. फोर्ब्स बिलियनेअर्स लिस्टनुसार इलॉन मस्क सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण, तुम्हाला जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी माहिती आहे का? टाईम मासिकाने २०२५ मधील जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये रेश्मा केवलरमानी (Reshma Kewalramani) या एकमेव भारतीय महिलेचा समावेश आहे. रेश्मा यांचे नाव यादीत आल्याने लोक गुगलवर त्यांच्याबाबत सर्च करू लागले आहेत. कोण आहेत रेश्मा केवलरमानी? काय काम करतात? असे प्रश्न तुमच्या मनात येणंही साहजिक आहे.
रेश्मा केवलरमानी कोण आहे? :
रेश्मा केवलरमानी यांचा जन्म मुंबईत झाला. मात्र, अवघ्या ११व्या वर्षी कुटुंबासोबत त्यांना अमेरिकेत जावं लागलं. सध्या त्या बोस्टनमध्ये राहतात. त्यांना २ जुळी मुले देखील आहेत. १९९८ मध्ये, रेश्मा यांनी बोस्टन विद्यापीठातून लिबरल आर्ट्स/मेडिकल एज्युकेशन प्रोग्राम पूर्ण केला. यानंतर त्यांना मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमध्ये फेलोशिप मिळाली.
यानंतर, २०१५ मध्ये, त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून जनरल मॅनेजमेंटमध्ये पदवी प्राप्त केली. एक डॉक्टर म्हणून, त्यांनी मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल, ब्रिघम अँड वुमेन्स हॉस्पिटल आणि मॅसॅच्युसेट्स आय अँड इअर इन्फर्मरी आणि एमआयटी यासह अनेक प्रमुख हॉस्पिटलमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी बायोफार्मा क्षेत्रात प्रवेश केला. १२ वर्षांहून अधिक काळ अमेझॉनमध्ये काम केले.
२०१७ मध्ये व्हर्टेक्समध्ये सामील :
रेश्मा २०१७ मध्ये व्हर्टेक्समध्ये रुजू झाली. २०१८ मध्ये येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी पदाची जबाबदारी त्यांना मिळाली. २०२० मध्ये कंपनीने त्यांना सीईओ बनवले. सध्या, त्या व्हर्टेक्सच्या संचालक मंडळाच्या सदस्य देखील आहेत. रेश्मा यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने चांगलं यश मिळवले आहे.
कंपनीने ट्रिफॅक्टासह २ नवीन उपचार पद्धती विकसित केल्या आहेत. हे सिस्टिक फायब्रोसिस नावाच्या गंभीर अनुवांशिक आजारावर उपचार करते. कंपनीने VX-147 देखील विकसित केले आहे. हे औषध सध्या चाचणीच्या टप्प्यात आहे. हे एका प्रकारच्या मूत्रपिंडाच्या आजारासाठी प्रभावी आहे. पहिल्यांदाच, अमेरिकन औषध एजन्सी एफडीएने कंपनीच्या सीआरआयएसपीआर तंत्रज्ञानावर आधारित थेरपीला मान्यता दिली, जी 'सिकल सेल' नावाच्या गंभीर आजारावर उपचार करते.
वाचा - कोल इंडियापासून एलआयसीपर्यंत.. सरकार विकणार 'या' ४ कंपन्यांमधील हिस्सा; कशी आहे प्रक्रिया?
यादीत आणखी कोणाचा समावेश? :
२०२५ मध्ये टाईमने १०० सर्वात प्रभावशाली यादीत ३२ देशांतील लोकांचा समावेश केला आहे. यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पपासून ते मार्क झुकरबर्ग, पंतप्रधान कीर स्टार्मर, बांगलादेशचे पंतप्रधान मुहम्मद युनूस यांच्यापर्यंत अनेक लोकांची नावे आहेत.