नवी दिल्ली : कोरोनाकाळात डिजिटल उद्योगास प्रचंड चालना मिळाल्यामुळे देशातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांत तंत्रज्ञ व्यावसायिकांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नव्या संधी पदरात पाडून घेण्यासाठी तंत्रज्ञ राजीनामे देऊन दुसऱ्या कंपन्यांची वाट धरताना दिसून येत आहेत. (Resignation session in IT companies Accenture, Infosys, Viprot Attrition rate High)
ॲक्सेंचर, कॉग्निझंट, इन्फोसिस आणि विप्रो यासारख्या आघाडीच्या आयटी कंपन्यांमध्ये ॲट्रिशन दर, म्हणजेच लोक सोडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या जागांचे प्रमाण नव्या उच्च्चांकावर गेले आहे. मागील ९० दिवसांत म्हणजेच जानेवारी ते मार्च या तिमाहीत कॉग्निझंटच्या २१ टक्के, तर ॲक्सेंचरच्या १७ टक्के कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. कॉग्निझंटमध्ये मागच्या वर्षी या काळातील ॲट्रिशन दर १९ टक्के होता. ॲक्सेंचरच्या सीईओ जुली स्वीट यांनी सांगितले की, २०२१ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीची कामगिरी उत्तम राहिली आहे. मात्र, तंत्रज्ञ व्यावसायिकांची मागणी प्रचंड वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांचा ॲट्रिशन दरही साथपूर्व काळाच्या पातळीवर गेला आहे. कॉग्निझंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन हम्फ्रीज यांनी सांगितले की, ॲट्रिशन दर २१ टक्क्यांवर जाणे ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे.
इन्फोसिसचा ॲट्रिशन दर १५.२ टक्के -
- मागील तीन महिन्यांतील इन्फोसिसचा ॲट्रिशन दर १५.२ टक्के राहिला आहे. इन्फोसिस ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी आहे.
- सूत्रांनी सांगितले की, तिसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी विप्रोच्या १२.१ टक्के जागा या काळात रिक्त झाल्या आहेत. पहिल्या क्रमांकाची आयटी कंपनी टीसीएसमधील ॲट्रिशन दर ७.२ टक्के इतका असून, अन्य कंपन्यांच्या तुलनेत तो खूपच कमी आहे.