नवी दिल्ली : नाणे बाजारात रुपयाची होणारी घसरगुंडी थांबविणे व विदेश व्यापारातील तूट कमी करणे यासाठी केंद्र अनावश्यक वस्तू/उत्पादनांच्या आयातीवर निर्बंध आणण्याचा विचारात आहे, अशी माहिती वाणिज्य मंत्रालयातील सूत्रांनी दिली.गेल्या तीन वर्षांपासून विदेश व्यापारातील तूट (आयात व निर्यात यामधील तफावत) सतत वाढत आहे. २०१६-१७ मधे विदेश व्यापार तूट सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) ०.६० टक्के होती ती २०१७-१८ मध्ये वाढून १.९० टक्के झाली व २०१८-१९ या चालू वर्षात आॅगस्टपर्यंत २.८० टक्के झाली आहे. डॉलरमध्ये ही तूट २०१७-१८ मध्ये ६७.३० अब्ज डॉलर्स होती ती आॅगस्ट २०१८ पर्यंत ८०.४० अब्ज डॉलर्स झाली आहे.या सर्वांचा परिपाक म्हणून डॉलरच्या तुलनेत रुपया दररोज कमजोर होत आहे. सोमवारी बाजार बंद झाला तेव्हा एक डॉलरला रुपयाची किंमत ७२.४६ होती. त्यामुळेच देशाला सर्वाधिक गरजेची असलेली पेट्रोलियम उत्पादने व कच्चे तेल वगळता सरकारने इतर अनावश्यक वस्तू तसेच उत्पादनांच्या आयातीवर निर्बंध आणण्याचे ठरविले आहे.
रुपयाची घसरगुंडी रोखण्यासाठी आयातीवर आणले जाणार निर्बंध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 12:24 AM