मुंबई - बँकिंग नियमावलींचे उल्लंघन केल्याचा ठपका विविध अहवालात ठेवल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेला आज मोठा धक्का दिला आहे. २९ फेब्रुवारीनंतर खात्यात पैसे भरण्यासह नव्या ग्राहकांची नोंदणी, प्रीपेड सेवा, वॉलेट व फास्टॅग रिचार्ज आदी बँकिंग सेवा पेटीएम बँकेद्वारे करता येणार नाही. तथापि पेटीएम बँकेचे ग्राहक सध्या त्यांच्या खात्यातील रक्कम काढू शकतात. रक्कम काढून घेण्यावर कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. रिझर्व्ह बँकेने बुधवारी याबाबतचे आदेश जारी करताना पेटीएम बँकेने सातत्याने नियमांचे उल्लंघन आणि लेखापरीक्षणासंबंधी चिंता व्यक्त केली.
पेटीएमचे शेअर कोसळणार?
आरबीआयच्या या निर्णयामुळे गुरुवारी पेटीएमच्या शेअरवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूक धास्तावलेले आहेत. त्यातच पेटीएम पेमेंट बँकेद्वारे पोस्टपेड कर्ज कमी करण्याचा निर्णयामुळे मागील काही दिवसांपासून पेटीएमचे शेअरमध्ये सातत्याने घसरण होत होती. यामुळे शेअरधारकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे.
‘यूपीआय’वर बंदी नाही
बँकिंग व्यवहारांवर बंदी आणण्यात आली तरी यूपीआय सेवा पुरविण्याचे आदेश पेटीएमला देण्यात आले आहे.
ग्राहकांना काय करता येईल, काय नाही?
- पेटीएम पेमेंट बँकेच्या ग्राहकांना २९ फेब्रुवारीनंतर बचत खात्यात पैसे भरणे, पेटीएम वॉलेट व फास्टॅग, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डमध्ये टॉप-अप रिचार्ज करण्यावर निर्बंध येणार आहे. परंतु व्यवहारांवर मिळालेले व्याज, कॅशबॅक वा रिफंड कधीही जमा करता येईल
- सध्या खात्यात असलेली रक्कम, पेटीएम वॉलेट, फास्टॅग, तसेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डमधील रक्कम कोणत्याही निर्बंधांविना काढता येईल.
- ग्राहकांना २९ फेब्रुवारीनंतर मात्र पैसे हस्तांतरण, आयएमपीएस करता येणार नाही.
- २९ फेब्रुवारीला वा पूर्वी केलेले मात्र पूर्ण न झालेले बँकिंग व्यवहार १५ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे.