नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे त्रासलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण आता आणखी वाढला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉकडाऊन यामुळे अनेकांच्या नोकऱ्या संकटात सापडल्या. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. तर कित्येकांना पगार कपात सहन करावी लागली. त्यानंतर आता सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे.
पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. इंधनाच्या किमती वाढल्यानं वाहतूक खर्च वाढला आहे. त्यामुळे वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. महागाईच्या आघाडीवर ग्राहक मूल्य निर्देशांकावर (सीपीआय) आधारित महागाई दरात वाढ झाली आहे. जून २०२१ मध्ये सीपीआय वाढून ६.२६ टक्क्यांवर पोहोचला आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्यानं वाहतुकीसाठी होणारा खर्च वाढला आहे. त्यामुळे जूनमध्ये किरकोळ महागाई वाढली आहे.
जून २०२१ मध्ये खाद्य महागाई दर ५.१५ टक्क्यांवर
मे २०२१ दरम्यान सीपीआय आधारित महागाई दर ६.३० टक्के होता. हा सहा महिन्यांतील उच्चांक होता. आता जून २०२१ मध्ये लागोपाठ दुसऱ्यांदा किरकोळ महागाईचा दर चलनविषयक धोरण समितीकडून २ टक्क्यांपेक्षा कमी किंवा जास्तीत जास्त ४ टक्के निश्चित करण्यात आला होता. मात्र सीपीआय आधारित महागाईचा दर निर्धारित लक्ष्याच्या पुढे पोहोचला. खाद्य वस्तूंच्या दरात वाढ झाल्यानं महागाईत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.