स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या रेशनच्या बिलात सातत्याने वाढ होत आहे. खाद्यतेलाच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महाग पेट्रोल आणि विजेनेही उरली-सुरली कसर काढली आहे. यामुळे डिसेंबर 2021 मध्ये किरकोळ महागाईदर 5.59% वर पोहोचला आहे. हा आकडा भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या महागाई दराच्या कमाल मर्यादेच्या अगदी जवळ आहे.
खान्या-पिण्याच्या वस्तूंचे भाव वाढले -
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने बुधवारी किरकोळ महागाई दर डिसेंबर 2021 ची आकडेवारी प्रसिद्ध केली. यानुसार अन्नधान्य आणि रेशनच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने महागाईचा दर वाढला आहे. डिसेंबर महिन्यात खाद्य पदार्थांच्या महागाईचा दर 4.05 टक्के झाला आहे. जो नोव्हेंबर 2021 मध्ये केवळ 1.87% होते.
भाज्या स्वस्त, खाद्यतेलाने डोळ्यात पाणी आणलं -
सरकारी आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 मध्ये, भाज्यांचा महागाई दर गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत कमी होऊन त्यात 2.99% ची घसरण झाली आहे. या कालावधीत खाद्यतेलाच्या महागाई दरात 24.32% तर इंधन आणि विजेच्या महागाई दर 10.95% एवढी वाढ झाली आहे.
सलग तिसऱ्या महिन्यात वाढली महागाई -
यापूर्वी, नोव्हेंबर 2021 मध्ये किरकोळ महागाई दर 4.91% होता, ऑक्टोबरमध्ये 4.48% होता. तर सप्टेंबर 2021 मध्ये हा ऑगस्ट 2021 च्या तुलनेत 4.35% पर्यंत खाली आला होता. ऑगस्ट 2021 मध्ये हा आकडा 5.3% होता. तर गेल्या वर्षी डिसेंबर 2020 मध्ये हा दर 4.59% होता.