कोरोना महासाथीचा फटका देशातील अनेक क्षेत्रांना बसला होता. परंतु आता हळूहळू सर्वच क्षेत्रे पूर्वपदावर येण्याचे प्रयत्न करत आहेत. सप्टेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारात विक्री कोविडपूर्व पातळीच्या ९६ टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत यात २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. असोसिएशन ऑफ रिटेलर्सनं (RAI) बुधवारी यासंदर्भातील दावा केला आहे.
सप्टेंबर २०१९ च्या तुलनेत किरकोळ विक्री केवळ ४ टक्क्यांनी कमी झाली आहे. सर्वाधिक ३३ टक्के वाढ ही दक्षिण भारतात, तर पूर्वेकडील भागात ३० टक्के, पश्चिमेकडील भागात २६ टक्के आणि उत्तर भारतात १६ टक्के झाली असल्याची माहिती असोसिएशन ऑफ रिटेलर्सचे (RAI) मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी दिली.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रांमध्ये विक्रीचा आलेख हा वाढता दिसून येत आहे. तसंच पुढील महिन्यात तो कोविडपूर्व पातळीच्या पुढे जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हॉटेल, रेस्तराँ या ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढत आहे. तर दुसरीकडे खेळाचं सामान, कपडे आणि अन्य आवश्यक वस्तूंच्या विक्रीतही मोठी वाढ दिसून आली आहे. दसरा-दिवाळी यांसारख्या सणांच्या कालावधीत विक्रीमध्ये अधिक वेग दिसून येईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सीमेंट उत्पादनात वाढ
रिअर इस्टेट क्षेत्रात वाढलेली मागणी आणि घरांची होणारी विक्री यामुळे सीमेंट क्षेत्रात गेल्या पाच महिन्यांमध्ये ४४ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०१९ या कालावधीच्या तुलनेत सीमेंट उत्पादन २ टक्क्यांनी वाढून १४.२ कोटी टन इतकं झालं, अशी माहिती देशांतर्गत रेटिंग एजन्सी इक्रानं बुधवारी दिली. सुरू आर्थिक वर्षात सीमेंट उत्पादनात १२ टक्क्यांची वाढ होईल असा अंदाजही इक्रानं व्यक्त केला.