केंद्र सरकार देशातील मुलं, महिला तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना सुरू करत असते. सरकारनं देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम (Senior Citizen Saving Scheme) सुरू केली आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सुरक्षित योजना आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
जर तुम्हीही निवृत्तीनंतर गुंतवणुकीच्या योजनेचा विचार करत असाल तर तुम्ही तुमचे पैसे ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवू शकता. चला जाणून घेऊया ज्येष्ठ नागरिक बचत योजनेविषयी अधिक माहिती.
कोण गुंतवणूक करू शकेल?
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेला कोणीही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. याशिवाय ५५ वर्षांवरील आणि ६० वर्षांखालील निवृत्त कर्मचारीही या योजनेत गुंतवणूक करू शकतात. तसंच ५० वर्षांवरील आणि ६० वर्षांखालील निवृत्त संरक्षण कर्मचारीही या योजनेत गुंतवणूक करू शकतात.
वार्षिक ८.२ टक्क्यांपर्यंत व्याज
या योजनेंतर्गत खातं उघडणाऱ्या (Senior Citizen Saving Scheme) ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक ८.२ टक्के व्याज मिळते. व्याजाची रक्कम ठेवीच्या तारखेपासून ३१ मार्च, ३० सप्टेंबर, ३१ डिसेंबर आणि त्यानंतर १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर आणि १ जानेवारी पर्यंत दिली जाते.
तुम्ही किती गुंतवणूक करू शकता?
ज्येष्ठ नागरिक बचत योजना खात्यात १००० रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकता. तर या योजनेत तुम्ही ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.