Join us

रिटर्न भरले, मात्र कर भरलाच नाही, स्व-कर मूल्यांकनाचा गैरफायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 4:30 AM

‘स्व-कर मूल्यांकन’ (सेल्फ-अ‍ॅसेसमेंट टॅक्स) सुविधेचा गैरफायदा घेऊन असंख्य करदात्यांनी विवरणपत्र तर भरले, पण प्रत्यक्षात कराचा भरणा केलाच नाही.

नवी दिल्ली : ‘स्व-कर मूल्यांकन’ (सेल्फ-अ‍ॅसेसमेंट टॅक्स) सुविधेचा गैरफायदा घेऊन असंख्य करदात्यांनी विवरणपत्र तर भरले, पण प्रत्यक्षात कराचा भरणा केलाच नाही. अशा लोकांकडे ५ हजार कोटी रुपये थकले असून, त्याच्या वसुलीसाठी प्राप्तिकर विभागाने पाठपुरावा सुरू केला आहे.प्राप्तिकर विभागाशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, प्रत्यक्षात करभरणा झालेला नसल्यामुळे, या लोकांची मागच्या वित्त वर्षाची विवरणपत्रे प्रोसेस होऊ शकलेले नाहीत. थकबाकीचा भरणा तातडीने करावा, यासाठी प्राप्तिकर विभागाकडून या लोकांशी संपर्क साधला जात आहे.प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या क्षणी आम्ही करदात्यांना स्मरण संदेश (रिमाइंडर) पाठवित आहोत. थकबाकी भरा, म्हणजे विवरणपत्र प्रोसेस होऊ शकेल, अशी विनंती त्यांना विभागाकडून केली जात आहे. स्व-मूल्यांकन केलेला कर आपण भरू, असे यातील बहुतांश करदात्यांनी म्हटले होते. तथापि, प्रत्यक्षात कराचा भरणा झालेला नाही. या सुविधेचा गैरवापर रोखण्यासाठी सुस्थापित व्यवस्था तयार आहे.ज्या कर्मचाºयांच्या करांचे पेमेंट फॉर्म १६ अन्वये अथवा टीडीएसच्या एएस-२६ फार्मनुसार झालेले नसते, त्यांच्यासाठी स्व-कर मूल्यांकन’ सुविधा आहे. त्यांनी समभागआणि म्युच्युअल फंडांच्या विक्रीवर भांडवली लाभ कर (कॅपिटल गेन टॅक्स) देणे आवश्यक आहे. हा कर विवरणपत्र दाखल करण्याआधीच भरावयाचा असतो.>ई-रिटर्न्समुळे थकबाकीदार शोधणे शक्ययाशिवाय वेतनाच्या व्यतिरिक्त जे उत्पन्न मिळते, त्यासाठीही ‘स्व-कर मूल्यांकन’ सुविधा उपयोगी पडते. विवरणपत्र भरताना बँकेचे चलन आणि बीएसआर क्रमांक सोबत सोडावा लागतो. तरीही अशा प्रकारे थकीत कराचे प्रकार घडतात. भूतकाळातही अशा घटनांची असंख्य उदाहरणे आहेत. ई-विवरणपत्रामुळे आता असे प्रकार लगेच शोधता येतात.

टॅग्स :कर