World Cup Flight Tickets : रविवारी रात्री क्रिकेट विश्वचषक २०२३ चा समारोप झाला. ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. या पराभवानंतर क्रिकेटच्या चाहत्यांची मनंही दुखावली. या काळात अहमदाबादमध्ये सामना पाहणाऱ्या लोकांच्या गर्दीमुळे हॉटेल, रेस्तराँ, टॅक्सी आणि विमान वाहतूक उद्योगांना मोठा फायदा झाला. मागणी वाढल्यानं विमान कंपन्यांच्या तिजोरीत मोठा पैसा आला.
तर दुसरीकडे शनिवारपासून भाड्यात अनेक पटींनी वाढ झाली आणि देशातील जवळपास सर्व मोठ्या शहरांच्या तुलनेत अहमदाबादमधील तिकिटांचे दर गगनाला भिडले. शनिवारी देशभरातील सुमारे ४.६ लाख लोकांनी विमान प्रवासाचा विक्रमही केला. या वेळी अहमदाबाद ते कोणत्या शहरात जाण्यासाठी तुम्हाला किती खर्च करावा लागेल ते आपण जाणून घेऊ.
प्रत्येक ठिकाणचा प्रवास महागविश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना संपल्यानंतर आता आपल्या घरी परतणाऱ्यांनाही महागडी विमान तिकिटं खरेदी करावी लागत आहेत. अहमदाबादच्या वेगवेगळ्या शहरांसाठी ऑनलाइन तिकिटं पाहिल्यानंतर त्याच्या किंमती अतिशय जास्त असल्याचं आढळून आलं. अहमदाबाद ते दिल्ली २० नोव्हेंबरच्या तिकीटाची किंमत २४ ते ४० हजार रुपये होती. त्याचप्रमाणे अहमदाबाद ते मुंबई विमानाचं तिकिट २५ ते ३६ हजार रुपये, कोलकात्याचं हवाई तिकीट ३८ ते ४९ हजार रुपयांवर गेलं होतं. विमान कंपन्या बेंगळुरूसाठी ३१ ते ५१ हजार रुपये आणि हैदराबादसाठी ३० ते ४३ हजार रुपये आकारत आहेत.नवे रकॉर्डदेशभरात शनिवारी जवळपास ४.६ लाख प्रवाशांनी हवाई प्रवास केला. एका दिवसात प्रवास केलेला ही सर्वाधिक संख्या आहे. मुंबई एअरपोर्टवरही एका दिवसात १.६१ लाखांपेक्षा अधिक प्रवासी पोहोचले होते. हा एकप्रकारचा विक्रम आहे.