Join us

भारत पेट्रोलियमचे फेरमूल्यांकन; शेअर्सच्या किमतीवर होणार नाही विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 3:04 AM

विक्रीची योजना : कंपनीची मालमत्ता आणि त्यावरील सुमारे २० टक्के प्रीमियम याचा विचार करता बीपीसीएलची किंमत १ ते २ लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे या विक्री प्रक्रियेशी संबंधित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले

नवी दिल्ली : सरकारने विक्रीसाठी काढलेल्या भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे फेरमूल्यांकन करून या कंपनीची विक्री करण्याचा सरकार गंभीरपणे  विचार करीत आहे. या कंपनीची विक्री करताना केवळ शेअर्सच्या किमतीचा एकमात्र निकष लावला जाणार नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

कोणत्याही कंपनीची विक्री करताना त्या कंपनीच्या शेअर्सचे मूल्य आणि कंपनीच्या एकूण मालमत्तेचे मूल्य यांची एकत्रितपणे सांगड घालून मग त्या कंपनीची किंमत ठरविली जाते. भारत पेट्रोलियमच्या समभागांची किंमत ८०० रुपये आहे, मात्र, या कंपनीच्या एकूण मालमत्तेचा विचार करता या कंपनीचे मूल्य  शेअर्सच्या किमतीपेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे नव्याने मूल्यांकन करून त्यानंतर या कंपनीची विक्री करण्याचा विचार सरकार करत आहे. 

कंपनीची मालमत्ता आणि त्यावरील सुमारे २० टक्के प्रीमियम याचा विचार करता बीपीसीएलची किंमत १ ते २ लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे या विक्री प्रक्रियेशी संबंधित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले. सध्या केंद्र सरकारकडे या कंपनीचे ५२.९८ टक्के भांडवल आहे. दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, बीपीसीएल ही राष्ट्रीय संपत्ती असून या कंपनीच्या शेअर्सच्या किमतींमध्ये थोडा फार फरक झाला तरी राष्ट्राच्या दृष्टीने त्याचा मोठा फटका बसू शकतो. त्याचप्रमाणे याबाबत काही कमी जास्त झाल्यास महालेखापाल याबाबत जाब विचारू शकतात. त्यामुळे या कंपनीचे खासगीकरण करताना केंद्राला अतिशय विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षामध्ये निर्गुंतवणुकीचे मोठे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. 

टॅग्स :बजेट 2021