Join us

चार संस्थांनी दर्शविली पीएमसी बँकेच्या अधिग्रहणाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 2:37 AM

नोव्हेंबरमध्ये पीएमसी बँकेने आपल्या अधिग्रहणासाठी पात्र संस्थांकडून इरादापत्रे मागितली होती.

मुंबई : पंजाब व महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेचे अधिग्रहण करण्याची तयारी चार संस्थांनी दर्शविली आहे. त्यामुळे बँकेच्या लाखो ठेवीदारांच्या अडचणी संपण्याची शक्यता दृष्टिपथात आली आहे.नोव्हेंबरमध्ये पीएमसी बँकेने आपल्या अधिग्रहणासाठी पात्र संस्थांकडून इरादापत्रे मागितली होती. इरादापत्रे सादर करण्याची मुदत गुरुवारी सायंकाळी संपली. माहीतगार सूत्रांनी सांगितले की, चार संस्थांनी पीएमसी बँकेचे अधिग्रहण करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांनी इरादापत्रे सादर केली आहेत. त्यांच्या अर्जांची आता छाननी केली जाईल.वित्तीय क्षेत्रातील कंपन्या आणि औद्योगिक संस्था यांनी भागीदारीत अर्ज केले आहेत. या संस्था रिझर्व्ह बँकेच्या निकषांत बसणे आवश्यक आहे. पीएमसी बँकेला छोट्या वित्तीय बँकेत रूपांतरित करण्याचा पर्याय संभाव्य खरेदीदारांना उपलब्ध असेल, तथापि, त्यासाठी त्यांना रिझर्व्ह बँकेकडून परवाना मिळवावा लागेल. असा परवाना मिळण्यासाठी खरेदीदार संस्था आधी पात्र असावी लागेल. पीएमसी बँक ही बहुराज्यीय बँक आहे. 

टॅग्स :पीएमसी बँक