Lokmat Money > बिझनेस न्यूज > विमान कंपन्यांत पुन्हा दरयुद्ध

विमान कंपन्यांत पुन्हा दरयुद्ध

विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झालेली असतानाच आता ही तेजी कायम राखण्याच्या दृष्टीने विमान कंपन्यांतील स्पर्धा अधिकच तीव्र झाली

By admin | Published: May 19, 2016 04:46 AM2016-05-19T04:46:06+5:302016-05-19T04:46:06+5:30

विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झालेली असतानाच आता ही तेजी कायम राखण्याच्या दृष्टीने विमान कंपन्यांतील स्पर्धा अधिकच तीव्र झाली

Revolution in aircraft companies | विमान कंपन्यांत पुन्हा दरयुद्ध

विमान कंपन्यांत पुन्हा दरयुद्ध


मुंबई : गेल्या वर्षभरात देशातील विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झालेली असतानाच आता ही तेजी कायम राखण्याच्या दृष्टीने विमान कंपन्यांतील स्पर्धा अधिकच तीव्र झाली असून काही प्रमुख कंपन्यांनी पुन्हा एकदा बंपर सेल योजनेद्वारे दरयुद्ध छेडले आहे. आणखी एक ते दोन दिवस हे दरयुद्ध ग्राहकांना अनुभवण्यास मिळेल आणि याकरिता ५११ रुपये ते २०११ रुपयांच्या दरम्यान (कर वगळता) किमतीने तिकिटांची विक्री करण्याची योजना आखली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, इंडिगो, स्पाइस जेट, एअर एशिया या कंपन्यांनी याची सुरुवात केली असून भारतीय विमान क्षेत्रातील अन्य कंपन्याही लवकरच यामध्ये या दरयुद्धात उतरण्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, विमान कंपन्यांच्या अशा बंपर सेल योजनांचा गेल्या तीन वर्षांचा कालावधी लक्षात घेतला तर अशी विक्री योजना जून अथवा जुलै महिन्यात घोषित होते आणि त्याचा कालावधी हा सप्टेंबर आणि आॅक्टोबरपर्यंतचा असतो. परंतु, यंदा प्रथमच जून ते सप्टेंबर या तुलनेने कमी गर्दीच्या कालावधीसाठी ही सेल योजना या कंपन्यांनी घोषित केली आहे.
आता जी घोषणा या कंपन्यांनी केली आहे ती १५ जून ते सप्टेंबर या कालावधीकरिता आहे. प्रत्येक कंपनीने आपापला कालावधी या दरम्यान निश्चित केला आहे. तसेच या कंपन्यांनी तिकीट विक्रीची ही योजना दिल्ली, मुंबई, बंगलोर, हैदराबाद, चेन्नई यासारख्या व्यस्त मार्गांसोबतच देहरादून, बागडोरा, उदयपूर, जम्मू, कोलकाता या आणि अशा अनेक नियमित नसलेल्या मार्गांकरिताही राबविली आहे.
या तीनही कंपन्या देशातील बहुतांश शहरांतून उड्डाण करतात. त्यामुळे तेथील मार्गांकरिता तर ही योजना राबविली जात आहेच, पण ज्या कंपन्या परदेशातही विमान सेवा देत आहेत, त्या कंपन्यांनी बँकॉक, कोलंबो, दुबई, मस्कत अशा मार्गांकरितादेखील या सूट योजनेची घोषणा केली आहे. (प्रतिनिधी)
चालू वर्षात येणार नवी ५० विमाने
विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याने चालू आर्थिक वर्षात देशातील विमान कंपन्यांच्या ताफ्यातील विमानांच्या संख्येत ५० नव्या विमानांची भर पडणार आहे. यातील बहुतांश विमानेही ए-३२० सारखी महाकाय आहेत.
>स्वस्त तिकिटांचे कारण काय?
दरवर्षीचा प्रवाशांचा ट्रेंड तपासला तर जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये तुलनेने कमी लोक विमानाने प्रवास करतात. विशेषत: शाळा-कॉलेज सुरू होत असल्यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या फारच कमी असते.
कमी प्रवासी असलेल्या काळातही अधिकाधिक लोकांना विमान प्रवासाकडे आकृष्ट करण्यासाठी यंदा विमान कंपन्यांनी आताच तिकिटांची ही बंपर सेल योजना जाहीर केली आहे.
विशेषत: ज्या मार्गांवर प्रवाशांची फारशी गर्दी नसते अथवा जी पर्यटनस्थळे आहेत अशा ठिकाणीदेखील गर्दी खेचण्यासाठी या योजनेचे नियोजन केल्याचे दिसून येते.

Web Title: Revolution in aircraft companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.