नवी दिल्ली : विमा नियामक इरडा एक विशेष डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्याचे काम करीत आहे. ‘बिमा सुगम’ असे या प्लॅटफॉर्मचे नाव असून या प्लॅटफॉर्मवर विमा पॉलिसी खरेदी करता येईल, तसेच विम्याशी संबंधित इतर सुविधांचा लाभ घेता येईल. या प्लॅटफॉर्ममुळे विमा एजंट अथवा ब्रोकरांची भूमिका जवळपास संपुष्टातच येईल.
‘बिमा सुगम’मुळे एजंटांच्या कमिशनपासून मुक्ती
यूपीआयने वित्तीय देवाण-घेवाणीत जी क्रांती घडवून आणली आहे, तशीच क्रांती ‘बिमा सुगम’मुळे विमा क्षेत्रात होईल.
‘बिमा सुगम’ सुरू झाल्यानंतर देशातील विमा क्षेत्र पूर्णत: रूपांतरीत झालेले असेल, असे जाणकारांना वाटते. त्याबद्दल जाणून घेऊया.
विशेष डिजिटल प्लॅटफॉर्मवर इरडाचे काम सुरू
विमा होणार स्वस्त
सध्या विमा एजंट ३० ते ४० टक्के कमिशन घेतात. बिमा सुगममध्ये त्यांना फक्त ५ ते ८ टक्के कमिशन मिळेल. त्यामुळे विम्याची किंमत घटेल. हप्ता कमी होईल.
सर्व पॉलिसी एका क्लिकवर
योग्य पॉलिसी निवडणे बिमा सुगममुळे सोपे होईल. कारण एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व कंपन्यांच्या सर्व पॉलिसी उपलब्ध होतील. खासगी विमा एग्रीगेटर ही सुविधा देतात, पण त्यासाठी ते कमिशन घेतात.
दावा निपटारा सुलभ होणार
या प्लॅटफॉर्मवर केवळ पॉलिसी नंबरच्या आधारे ‘पेपरलेस क्लेम सेटलमेंट’ होईल. पॉलिसी घेण्यापासून दावा दाखल करेपर्यंत सर्व प्रक्रिया डिजिटल असेल.
तक्रार निवारण गतिमान होणार
बिमा सुगम पोर्टलचा वापर एजंट, वेब एग्रीगेटर व अन्य विमा मध्यस्थही करू शकतील. पॉलिसीधारकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने होईल. तसेच ग्राहकांना चांगली सेवा मिळेल.
अनेक पर्याय मिळणार
ग्राहकांना स्वत:च्या इच्छेनुसार विमा पाॅलिसी खरेदी करता येईल. माहिती न समजल्यास एखाद्या तज्ज्ञाचीही मदत ग्राहकाला घेता येईल. थेट कंपनीलादेखील संपर्क करुन विमा पाॅलिसी खरेदी करण्याचा पर्याय या पाेर्टलवर असेल.