नवी दिल्ली : आगामी दसरा-दिवाळी हे सण ध्यानात घेऊन आपल्या वाहनांची विक्री जोरात व्हावी यासाठी देशातील प्रमुख कार कंपन्यांनी ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना सादर केल्या आहेत.मारुती सुझुकी इंडिया, ह्युंदाई मोटार्स आणि टाटा मोटार्स यासारख्या आघाडीच्या मोटार कंपन्यांनी ३७ हजार रुपयांपर्यंत सवलत देण्याची पेशकश केली आहे. मारुतीने हॅचबॅक सॅलेरियोवर ५ हजार रुपयांच्या रोख रकमेची सवलत दिली असून आल्टो ८०० वर ३५ हजार रुपयांपर्यंत सवलत देऊ केली आहे. याशिवाय मारुतीने वॅगन आर, स्टीनग्रे आणि डिझायरवरही सवलत दिली आहे, पण अलीकडेच बाजारात आणलेल्या सियाजवर कोणतीही सवलत दिलेली नाही.मारुतीचे कार्यकारी संचालक (एम अॅण्ड एस) आर.एस. कल्सी यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, आमच्या या योजनांवर ग्राहकांनी खूपच उत्साह दाखविला आहे. कंपनीने यापूर्वी सणवार ध्यानात घेऊन आॅल्टो ८०० ओणम, वॅगन्स आर अॅवान्स, स्वीफ्ट ग्लोरी, आॅल्टो-१० उरबानो आदी सहा मॉडेल सादर केले होते. ह्युंदाईने आपल्या इयान या मॉडेलवर सर्वाधिक ३७ हजार रुपयांची सूट जाहीर केली आहे. याशिवाय आय-१०, ग्रँड आय १० या दोन्ही मॉडेलवर प्रत्येकी २६ हजार रुपयांची सूट दिली आहे. कंपनीने कॉम्पॅक्ट सेडानवर २८ हजार रुपयांपर्यंत आणि मिड साईज सेडानवर १५ हजार रुपयांच्या सवलतीची घोषणा केली आहे.
उत्सव काळासाठी कार कंपन्यांकडून ग्राहकांवर बक्षीस योजनांची उधळण
By admin | Published: October 11, 2015 10:21 PM