लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : अनियमित पावसामुळे यंदा शेती उत्पादनांवर विपरीत परिणाम होऊन अन्नधान्याची टंचाई निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अन्नधान्य महाग होऊ नये, यासाठी सरकारने विविध उपाययोजना हाती घेतल्या. त्यातूनच सरकारने नागरिकांना २५ रुपये प्रति किलो इतक्या माफक दरात तांदूळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारने याआधीच ‘भारत ब्रँड’ या नावाखाली स्वस्तातील गव्हाचे पीठ उपलब्ध करून दिले आहे. याच ब्रँडच्या अंतर्गत तांदूळही उपलब्ध करून दिला जाईल. सध्या बाजारात बासमती प्रतिकिलो ५० रुपयांत तर साधा तांदूळ सरासरी ४३ रुपये किलो दराने मिळत आहे. नोव्हेंबरमध्ये अन्नधान्यांच्या किमती १०.२७ टक्क्यांनी वाढल्याने खाद्य महागाई ८.७ टक्के इतकी झाली. ऑक्टोबर महिन्यात ती ६.६१ टक्के इतकी होती. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला.
गहू, कांदा आणि डाळींचीही विक्री
६ नोव्हेंबर २०२३ रोजी रोजी केंद्र सरकारने २७.५० रुपये प्रति किलो या दराने ‘भारत आटा’ लाँच केला. हे पीठ १० आणि आणि ३० किलोच्या बॅगांमध्ये उपलब्ध करून दिले जाते. सध्या देशात पीठाचा सरासरी भाव ३५ रुपये किलो आहे. ब्रँडेड कंपनीच्या आट्याचा विचार केल्यास तो आटा प्रति किलो ४० ते ५० रुपये किलोने विकला जात आहे. पीठाशिवाय केद्र सरकार कांदा आणि डाळींचीही स्वस्तात विक्री करत आहे. सरकार सध्या २५ रुपये किलो दराने कांदा विकत आहे. याशिवाय हरभरा डाळ ६० रुपये किलो दराने विकली जात आहे.
कोठारात ४७.२ मेट्रिक टन तांदूळ
भारतात अन्नधान्यापैकी ४० टक्क्यांपेक्षा अधिक भात पिकवला जातो. जगभरात तांदळाच्या निर्यातीच्या बाजारपेठेत भारत हा प्रमुख निर्यातदारांपैकी एक आहे. यंदा कमी पावसामुळे तांदळाचे क्षेत्र घटले आहे. सरकारी कोठारामध्ये सध्या ४७.२ मेट्रिक टन इतका तांदळाचा साठा आहे. दरवर्षीच्या तुलनेत साठा कमी आहे.
ग्राहकांना कुठे मिळणार?
नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (नाफेड), राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) आणि केंद्रीय भांडार केंद्रामधून या तांदळाची विक्री केली जाणार आहे. तांदळाच्या वाढत्या किमती लक्षात घेता सरकारने व्यापाऱ्यांना इशारा दिला होता. साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णयही सरकारने घेतला होता.