नवी दिल्ली : अवकाळी पाऊस, भीषण गर्मी, पूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे जगावर तांदळाच्या टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. गेल्या २० वर्षांमध्ये अमेरिका, युराेप; तसेच प्रशांत महासागरालगतच्या प्रदेशात यंदा प्रथमच अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. अमेरिका, चीन; तसेच युराेपियन देशांमध्ये उत्पादन घटल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, तांदळाच्या किमतींत वाढ हाेऊ लागली आहे. महत्त्वाचे म्हणजे, भारतात परिस्थिती चांगली असून, देशातून माेठ्या प्रमाणावर निर्यात हाेत आहे.
रेटिंग एजन्सी फिचच्या माहितीनुसार, तांदळाच्या टंचाईमुळे जगावर खाद्य संकटाची भीती निर्माण झाली आहे. याचा आशिया आणि प्रशांत भूभागावर जास्त परिणाम हाेण्याची शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षात तांदळाचे जागतिक उत्पादन घट ८७ लाख टन एवढे झाले. २००३ नंतरचे हे सर्वांत कमी उत्पादन आहे.
उत्पादनात घट कशामुळे?
- रशिया-युक्रेन युद्धाचा उत्पादनावर परिणाम झाला. याशिवाय चीन आणि पाकिस्तानात हवामान, गर्मी, अवकाळी पाऊस, पूर इत्यादी कारणांमुळे उत्पादनात माेठी घट झाली आहे.
- इंडाेनेशिया, मलेशिया, तसेच आफ्रिकन देशांमध्ये माेठ्या प्रमाणावर आयात करावी लागणार आहे.
- तुर्की, सीरिया यांसारखे देशही प्रभावित हाेणार आहेत.
भारत सुस्थितीत, निर्यात वाढली
भारतात तांदळाचे उत्पादन चांगले झाले आहे. त्यामुळे माेठ्या प्रमाणावर निर्यात झाली आहे. आकडेवारीचा विचार केल्यास किमतीनुसार गेल्या ४ वर्षांमधील यंदा सर्वाधिक निर्यात आहे.
आर्थिक वर्ष निर्यात किंमत उत्पादन
२०१९-२० ९.४४ ५२,१२५ ११८
२०२०-२१ १७.७२ ७२,५०० १२४
२०२१-२२ २१.२० ७९,००० १२९
२०२२-२३ २१.० ९१,६०० १३०
निर्यात, उत्पादन लाख टनमध्ये किंमत काेटी रुपयांमध्ये
भारतीय तांदूळ स्वस्त आणि मस्त
देश ५% तुकडा २५% तुकडा
भारत ₹३५,४२० ₹३४,१९०
पाकिस्तान ₹३९,९२५ ₹३६,६५०
थायलँड ₹४१,४०० ₹४०,४१५
व्हिएतनाम ₹३८,२९० ₹३६,२४०
(दर प्रतिटन)
२२.२ लाख टन तांदळाची निर्यात वर्ष २०२२ मध्ये अमेरिका, व्हिएतनाम व पाकपेक्षा हा आकडा जास्त आहे.
खाद्यतेल किमती वाढण्याची भीती
सीमाशुल्काच्या वादामुळे सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या मोठ्या खेपा देशातील अनेक बंदरांवर अडकल्या आहेत. त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती वाढू शकतात, असा इशारा ‘सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन’ने (एसईए) दिला आहे. २०२२-२३ मध्ये शून्य शुल्कावर कच्चे सूर्यफूल व सोयाबीन तेल आयात करण्यासाठी ‘टीआरक्यू’ची परवानगी सरकारने दिली होती. ३१ मार्च लॅण्डिंग डेट असल्यास २० जूनपर्यंत निकासीची अनुमती त्यात होती. अधिकारी आता ‘बिल ऑफ एंट्री’वर जोर देत आहेत. त्यामुळे १ एप्रिल २०२३ पासून तेल बंदरांवर अडकून पडले आहे.