अलीकडेच, भारतीय उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) जगातील श्रीमंतांच्या यादीत टॉप-3 मध्ये सामील झाले आहेत. हे स्थान प्राप्त केल्यानंतर गौतम अदानी यांना आता ग्लोबल लीडरशिप अवॉर्डने (Global Leadership Award) सन्मानित करण्यात येणार आहे. यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिलने (USIBC) याची घोषणा केली आहे. 7 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या इंडिया आयडियाज समिटमध्ये गौतम अदानी यांना ग्लोबल लीडरशिप अवॉर्डने सन्मानित केले जाईल, असे यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिलने एका निवेदनात म्हटले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या (Bloomberg Billionaires Index) आकडेवारीनुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती (Gautam Adani Total Net Worth) 143 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अमेरिकेच्या ऊर्जा सचिव जेनिफर ग्रॅनहोम या यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिल परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 2007 पासून भारत आणि अमेरिकेतील आघाडीच्या उद्योगपतींना द्विपक्षीय व्यावसायिक संबंध मजबूत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी हा पुरस्कार दिला जात आहे. जेफ बेझोस, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, नॅस्डॅकचे प्रमुख एडेना फ्रेडमन, फेडएक्स कॉर्पोरेशनचे प्रमुख फ्रेड स्मिथ आणि कोटक महिंद्रा बँकेचे प्रमुख उदय कोटक यांनादेखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
तेजीनं संपत्तीत वाढ
अलीकडच्या काळात अदानीची नेटवर्थ झपाट्याने वाढली आहे. जगभरातील शेअर बाजारात विक्रीचा सपाटा संपल्यानंतर अदानीच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत आहे. 2022 हे वर्ष अदानींसाठी खूप चांगले ठरले आहे. अदानीची संपत्ती या वर्षात ज्या वेगाने वाढली आहे, त्या वेगाने कोणतीही कोट्यधीश व्यक्ती त्यांच्या आसपास पोहोचू शकत नाही. या वर्षी त्यांची एकूण संपत्ती 60 बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त वाढली आहे. गेले काही महिने गौतम अदानी यांच्यासाठी व्यवसायाच्या आघाडीवरही चांगले ठरले आहेत. यादरम्यान त्यांनी एकामागून एक अनेक महत्त्वाचे व्यवहार केले आहेत.
केल्या अनेक मोठ्या डील्स
मे महिन्यात गौतम अदानी यांच्या कंपनीने होल्सिमचा भारतीय सिमेंट व्यवसाय खरेदी करण्याची घोषणा केली. हा करार 10.5 अब्ज डॉलरमध्ये झाला होता. या करारामुळे अदानी समूह भारतीय सिमेंट बाजारात एका क्षणात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. अदानींची कंपनी अदानी पॉवरने या महिन्यात थर्मल पॉवर प्लांट ऑपरेटर डीबी पॉवरला 7,017 कोटी रुपयांना विकत घेण्याची घोषणा केली होती.