देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या अध्यक्षतेखालील अदानी समूहाने मोठ्या कर्जात असल्याच्या प्रकाशित रिपोर्टवर प्रतिक्रिया दिली आहे. निव्वळ कर्जाची स्थिती सुधारली आहे आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून घेतलेल्या निम्म्याहून अधिक कर्जाची परतफेड केली असल्याची माहिती अदानी समुहाकडून देण्यात आली.
अदानी समुहावर प्रचंड कर्ज असल्याचं म्हणणाऱ्या क्रेडिटसाइट्सच्या अहवालावर उत्तर देताना समुहाकडून १५ पानांची एक नोट जारी करण्यात आली आहे. यामध्ये, समुहाने म्हटले आहे की त्यांच्या कंपन्यांनी सातत्याने त्यांचे कर्ज फेडले आहे आणि करपूर्व किंवा एबिटा उत्पन्नाचे प्रमाण ३.२ पट राहिलं आहे. ९ वर्षांपूर्वी ते ७.६ टक्के इतकं होतं.
किती आहे कर्ज?
अदानी समुहाकडे उपलब्ध रोखीचा विचार करता, मार्च २०२२ मध्ये त्यांचे एकूण कर्ज १.८८ लाख कोटी रुपये आणि निव्वळ कर्ज १.६१ लाख कोटी रुपये होते. कंपन्यांच्या एकूण कर्जामध्ये सार्वजनिक बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे प्रमाण २०१५-१६ या आर्थिक वर्षात ५५ टक्के होते, परंतु २०२१-२२ या आर्थिक वर्षात ते एकूण कर्जाच्या केवळ २१ टक्क्यांवर आल्याची माहिती समुहाकडून देण्यात आली.
२०१५-१६ मध्ये खासगी बँकांकडून घेतलेल्या एकूण कर्जाचा हिस्सा ३१ टक्के होता. परंतु आता तो ११ टक्क्यांवर आला आहे. याउलट बॉन्डद्वारे मिळवलेल्या कर्जाचा हिस्सा १४ टक्क्यांनी वाढून ५० टक्के झाले आहे.
रेडिटसाइट्सनं जारी केला होता रिपोर्ट
फिच ग्रुप फर्म क्रेडिटसाइट्सने गेल्या महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालात अदानी समूह मोठ्या कर्जात असल्याचे म्हटलं होतं. हा समूह मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन त्याचा वापर आपल्या विद्यमान व्यवसायाचा विस्तार आणि नवा व्यवसाय उभारण्यात करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसंच परिस्थिती बिघडल्यास व्यवसायाच्या योदना मोठ्या कर्जात अडकू शकतात आणि त्याचा परिणाम एक किंवा अधिक कंपन्यांचं कर्ज न फेडण्याच्या रूपातही होऊ शकतो अशी भीतीही त्यांनी आपल्या अहवालात व्यक्त केली होती.