अदानी पॉवर ही गौतम अदानी समूहाची कंपनी आता बांगलादेशलावीजपुरवठा करणार आहे. वास्तविक, आशियातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश गौतम अदानी यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर गौतम अदानी यांनी ट्विटर पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. यासोबतच त्यांनी योजना सविस्तरपणे सांगितली.
अदानी समूहाची पूर्व भारतातील कोळशावर चालणाऱ्या प्रकल्पातून बांगलादेशला वीज निर्यात सुरू करण्याची योजना आहे. गौतम अदानी यांच्या मते, झारखंडमधील १६०० मेगावॅटचा गोड्डा वीज प्रकल्प आणि बांगलादेशला समर्पित ट्रान्समिशन लाइन १६ डिसेंबर २०२२ रोजी देशाच्या विजय दिवसापर्यंत कार्यान्वित करण्याची तयारी आहे.
गौतम अदानी यांचा हा प्रकल्प शेजारील देशांमध्ये भारताच्या वाढत्या प्रभावाचे उदाहरण आहे. अदानी समूहाने श्रीलंकेतही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. सध्या गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश आहेत. ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार गौतम अदानी यांची संपत्ती १४१ अब्ज डॉलर आहे आणि ते जगातील तिसरे सर्वात श्रीमंत अब्जाधीश आहेत.