नवी दिल्ली : रिक्षाचालक, फेरीवाले, चालक, घरगडी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांना रात्रीतून विविध कंपन्यांचे संचालक करण्याची किमया घोटाळेबाजांनी साधल्याची धक्कादायक माहिती कोट्यवधी रुपयांच्या बडोदा बँक घोटाळ्यातून प्रकाशात आली आहे.
उत्तर दिल्लीत ४० वर्षीय रसूल(नाव बदललेले) गाडीवरून भाजी विकतो. त्याची कमाई फार तर दरमहा १० हजार रुपये. तो रात्रीतून एका कंपनीचा संचालक बनला, हे त्याला माहीतही नव्हते. ही कहाणी एकट्या रसूलची नाही, तर असे ५९ गरीब हे खोटे उद्योजक आणि बडे असामी बनले. काळा पैसा पांढरा करणाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधत त्यांची मतदार ओळखपत्रे आणि दस्तऐवजांचा वापर करीत त्यांना संचालक बनविले. या बँकेतील घोटाळा ६,१७२ कोटी रुपयांचा आहे. व्यापारावर आधारित हे सर्वात मोठे मनी लाँड्रिंगचे (काळा पैसा) प्रकरण मानले जाते. बँकिंग हवाला घोटाळा अशीही त्याची ओळख बनली. कमी उत्पन्न गटातील नागरिकांच्या खात्यातून निर्यातदार आणि आयातदारांनी मोठ्या प्रमाणात काळा पैसा विदेशात पाठविला.
गेल्यावर्षी मेमध्ये हे सत्र सुरू झाले. व्यापारी गुरुचरणसिंग, चंदन भाटिया, संजय अग्रवाल आणि अन्य बडे व्यावसायिक बँक आॅफ बडोदाच्या अशोकविहार शाखेतून पैसा हाँगकाँग आणि दुबईकडे वळता करण्याचा कारभार करीत होते. या सर्वांसह बँकेचे सहायक व्यवस्थापक एस.के. गर्ग आणि या बँकेच्या विदेशी विनिमय विभागाचे प्रमुख जैनीश दुबे यांना सीबीआयने अटक केली आहे. या सर्वांनी झोपडपट्टीधारकांशी संपर्क साधून त्यांना पैशाचे आमिष दाखवत त्यांच्या बँकखात्यांचा वापर केला.
आयातही खोटीच
बँक आॅफ बडोदामध्ये खाती असलेल्या ५९ कंपन्यांच्या नावावर सुकामेवा, डाळी आणि तांदळाची खोटीच मोठी आयात दाखविण्यात आली. आॅगस्ट २०१४ पासून यावर्षी आॅगस्टपर्यंत म्हणजे वर्षभरात या खात्यांमध्ये ६१७२ कोटी रुपये जमा करण्यात आले.
विदेशी चलनाच्या रूपात मिळालेला परतावा आणि अन्य बँकाकडून वळत्या करण्यात आलेल्या रकमेचा त्यात समावेश होता. जुनी दिल्ली विशेषत: चांदणी चौकातील खात्यांमधून ही रक्कम चालू ५९ खात्यांमध्ये वळती करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
मतदार ओळखपत्रांसाठी दरमहा १० ते १५ हजार
दरमहा १० ते १५ हजार रुपये देण्याचे आमिष दाखवत वाहनचालक, फेरीवाले, रिक्षावाल्यांना त्यांचे मतदार ओळखपत्र मागण्यात आले. केवळ कागदपत्रांच्या बदल्यात एवढी मोठी रक्कम मिळत असल्यामुळे त्यांच्याकडून विरोध होण्याचे काही कारण नव्हते, असे एका गुंतवणूकदाराने सांगितले. मतदार ओळखपत्रांवरून पॅन कार्ड बनविण्यात आल्यानंतर या लोकांना संचालक दर्शवत बँक आॅफ बडोदामध्ये बनावट कंपन्यांच्या नावे खाती उघडली. या कंपन्या बनावट पत्त्यावर उघडण्यात आल्या असून अशा अनेक कंपन्यांचे संचालक आणि भागीदारांची नावे समान असल्याचे आढळून आले.
रिक्षाचालक, फेरीवाले रातोरात बनले कंपन्यांचे संचालक
रिक्षाचालक, फेरीवाले, चालक, घरगडी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांना रात्रीतून विविध कंपन्यांचे संचालक करण्याची किमया घोटाळेबाजांनी साधल्याची धक्कादायक माहिती
By admin | Published: November 23, 2015 09:56 PM2015-11-23T21:56:28+5:302015-11-23T21:56:28+5:30