रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी तीन वर्षांपासून कोणतंही वेतन घेतलेलं नाही. दरम्यान, आता पुढील पाच वर्षे ते कोणत्याही वेतनाशिवाय काम करणार आहेत. रिलायन्सनंमुकेश अंबानी यांना पुढील पाच वर्षांसाठी शून्य पगारावर कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) म्हणून नियुक्त करण्यासाठी भागधारकांची परवानगी मागितली आहे. या नव्या कार्यकाळात, अंबानी (६६) कंपनी कायद्यानुसार मुख्य कार्यकारी पदासाठी आवश्यक असलेली ७० वर्षे वयोमर्यादा ओलांडतील. यानंतर पुढील नियुक्तीसाठी भागधारकांच्या विशेष ठरावाची आवश्यकता आहे.
विशेष प्रस्तावात रिलायन्सनं अंबानी यांना एप्रिल २०२९ पर्यंत कंपनीचे चेअरमन म्हणून नियुक्त करण्याची परवानगी मागितली आहे. अंबानी १९७७ पासून रिलायन्सच्या संचालक मंडळात आहेत आणि २०२२ मध्ये आपले वडील आणि रिलायन्स समूहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर चेअरमन बनले होते. संचालक मंडळानं २१ जुलै २०२३ रोजी मुकेश अंबानी यांना व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुढील पाच वर्षांसाठीच्या नियुक्तीसाठी मंजुरी दिली असल्याचं रिलायन्सनं शेअर धारकांना पाठवण्यात आलेल्या विशेष प्रस्तावात म्हटलं. २८ ऑगस्ट रोजी रिलायन्सची एजीएम पार पडणार आहे.
तीन वर्षांपासून वेतन नाही
अंबानींनी आर्थिक वर्ष २००८-०९ पासून आर्थिक वर्ष २०१९-२० पर्यंत १५ कोटींचं वार्षिक वेतन घेतलं होतं. यानंतर कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कोणतंही वेतन किंवा लाभ आधारित कमिशन घेतलं नाही. १९ एप्रिल २०२४ ते १८ एप्रिल २०२९ पर्यंतच्या प्रस्तावित कालावधीसाठी त्यांना कोणतंही वेतन किंवा लाभ आधारित कमिशन दिलं जाणार नसल्याची शिफारस अंबानींच्या विनंतीवरून संचालक मंडळानं केल्याचं प्रस्तावात नमूद करण्यात आलंय.