Join us

खाद्य तेलाचे भाव भडकल्यामुळे कुटुंबांच्या आर्थिक घडीवर ताण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 6:15 AM

आयात शुल्क कमी करण्याचा सरकारचा विचार

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : खाद्य तेलाचे भाव अतिशय वेगाने वाढत असल्यामुळे त्यांना आवर घालण्यासाठी सरकार खाद्य तेलाचे आयात शुल्क कमी करण्याचा विचार करीत आहे. भारत देशांतर्गत गरजा भागवण्यासाठी दरवर्षी बऱ्याच प्रमाणात खाद्य तेलाची आयात करतो. रोजच्या वापरातील ही तेले महाग झाल्यामुळे कुटुंबांच्या आर्थिक घडीवर कोरोनाच्या या संकटात खूपच ताण पडला आहे. गेल्या महिन्यात खाद्य तेलाचे भाव विक्रमी उंचीवर गेल्यावर सरकार त्यावरील आयातीवरील कर कमी करण्याचा विचार करीत आहे. आयात शुल्क घटल्यावर देशातील बाजारात या खाद्य तेलाचे भाव काहीसे कमी होतील.

जगात तेलबियांच्या उत्पादनात काही अडचणी आल्या आहेत. भरीसभर म्हणून बायो़डिझेलचा वापरही वाढला आहे. यामुळे जगाच्या बाजारात खाद्य तेलाचे भाव भडकले. यावर्षी सोया ऑईल फ्यूचर्स ७० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे. दुष्काळामुळे अमेरिका आणि ब्राझीलहून सोयाबीनचा पुरवठा घटल्यामुळे असे झाले. अमेरिकेच्या कृषी विभागाने म्हटले की, जगात सोयाबीनचा साठा सप्टेंबरपर्यंत ८.७९ कोटी टन पाच वर्षांच्या खालच्या स्तरावर गेला आहे.

गेल्या वर्षी पाम तेलाच्या किमती १८ टक्क्यांनी भडकल्या होत्या. जगात सर्वात जास्त वापर याच तेलाचा होता. कोरोनामुळे दक्षिणपूर्व अशियाई देशांत लागवडीत आलेल्या अडथळ्यांमुळे त्याचा भाव वाढला. जागतिक किमती जास्त राहिल्यामुळे देशातील बाजारपेठेत पाम तेल आणि सोया तेलाचे भाव एका वर्षात दुप्पटीपेक्षा जास्त वाढले.

आयात १.५ कोटी टनांवरतेल उद्योगाच्या अनुमानानुसार दोन दशकांत भारताची पाम तेलाची आयात ४० लाख टनांवरून १.५ कोटी टनांवर गेली आहे. गेल्या महिन्यात खाद्य तेलांचे भाव विक्रमी उंचीवर गेले. भारत खाद्य तेलाची गरज जास्त आयातीने भागवतो. म्हणून त्याचे जगात भाव वाढले की त्याचा परिणाम देशातील तेल भावावर होतात.    

टॅग्स :महागाई