नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात बुधवारी पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली आहे. सबसिडीच्या तसेच विनासबसिडीच्या स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर १५ रुपयांनी महागले आहे. पेट्रोल २४ ते ३० पैशांनी, तर डिझेल ३२ ते ३६ पैशांनी महागले आहे. या दरवाढीनंतर देशातील इंधनाचे दर सार्वकालिक उच्चांकावर गेले आहेत.
आजच्या दरावाढीनंतर मुंबईमध्ये १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ९२६ रुपये झाली आहे. जुलै महिन्यापासून गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये ९० रुपयांची वाढ झाली आहे. गॅस सिलिंडरच्या दरात दर महिन्याला सुधारणा करण्यात येते. पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढ शहरानुसार भिन्न आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल ३० पैशांनी वाढून १०२.९४ रुपये लिटर झाले. डिझेल ३५ पैशांनी वाढून ९१.४२ रुपये लिटर झाले. मुंबईत पेट्रोल २४ पैशांनी वाढून १०८.६७ रुपये लिटर, तर डिझेल ३२ पैशांनी वाढून ९८.८० रुपये लिटर झाले. चेन्नईत पेट्रोल २६ पैशांनी वाढून १००.४९ रुपये लिटर, तर डिझेल ३४ पैशांनी वाढून ९५.९३ रुपये लिटर झाले. कोलकात्यात पेट्रोल २९ पैशांनी वाढल्यानंतर १०३.६५ रुपये लिटर झाले. डिझेल ३६ पैशांनी वाढून ९४.५३ रुपये लिटर झाले.
जागतिक बाजारातील दरवाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण ही दोन मुख्य कारणे या भाववाढीमागे आहेत, असे माहीतगार सूत्रांनी सांगितले. १ सप्टेंबर रोजी एलपीजी सिलिंडर २५ रुपयांनी महागले होते. त्याआधी १७ ऑगस्ट रोजीही गॅस २५ रुपयांनी महागला होता.