मुंबई : जानेवारी ते मार्च अशा अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील १३ प्रमुख शहरांतील निर्माणाधीन घरांच्या किमतींमध्ये तब्बल ३१ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यामध्ये दिल्ली शहराने प्रथम क्रमांक गाठला असून तेथील किमती सरत्या तीन महिन्यांत ७.८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यापाठोपाठ ग्रेटर नोएडामधील किमती ६.१ टक्क्यांनी वाढल्या असून याबाबतीत ५.७ टक्क्यांच्या वाढीसह मुंबई शहराने तिसरा क्रमांक गाठला आहे.
बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद येथील किमतींतही लक्षणीय वाढ नोंदली गेली आहे. बांधकाम क्षेत्राशी संबंधित कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती पुढे आली आहे.
चालू वर्षातील या पहिल्या तिमाहीचे वैशिष्ट्य म्हणजे या कालावधीमध्ये मुंबई उपनगरात २ बीएचके फ्लॅटची मागणी वाढताना दिसत आहे.
मुंबईत पश्चिम उपनगरांत मोठ्या प्रमाणावर विकासकामे पूर्ण होऊन ते प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे लोकांना फायदा होत आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरात घर घेण्याकडे लोक प्राधान्य देत आहेत.
वांद्रा ते गोरेगाव दरम्यान अनेक पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू आहेत. त्यात सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान जे पुनर्विकासाचे प्रकल्प साकारले जात आहेत, त्यामध्ये २ बीएचके तसेच २ अँड हाफ बीएचके घरांच्या निर्मितीचे प्रमाण अधिक आहे.
मात्र, जमिनीच्या किमती, बांधकाम साहित्याच्या किमतींत झालेली वाढ आणि लोकांची मागणी व त्या तुलनेत विशिष्ट भागात कमी असलेला पुरवठा यामुळे या किमती वाढत असल्याचे विश्लेषण केले जात आहे. मुंबई शहराच्या तुलनेत जास्त घडामोडी या दोन्ही उपनगरांत होताना दिसत आहेत. पूर्व उपनगरांतही घरांना मागणी वाढताना दिसत आहे.
मुंबईतील बदलता ट्रेण्ड
गेल्यावर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये या १३ शहरांतील घरांच्या किमतीमध्ये सरासरी ६.३ टक्के वाढ नोंदली गेली होती. तोच ट्रेन्ड पुढील तिमाहीतही कायम राहिल्याचे दिसून आले आहे. या सर्वेक्षणादरम्यान मुंबईतील ट्रेन्डमध्ये बदल होत असल्याचे दिसून येत आहे.