नवी दिल्ली : गेल्या एक वर्षाच्या काळामध्ये देशातील नऊ प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमतींमध्ये नऊ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. या यादीमध्ये हैदराबाद अव्वल स्थानावर असून, अहमदाबाद आणि पुण्याचा क्रमांक अनुक्रमे दुसरा व तिसरा आहे. याबाबतचे सर्वेक्षण प्रॉप टायगर या सल्लागार कंपनीने केले असून, त्याचा अहवाल ‘रिअल इनसेईट’ या त्रैमासिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार गेल्या वर्षभरामध्ये देशातील नऊ प्रमुख शहरांमधील घराच्या किमतीमध्ये जास्तीत जास्त नऊ टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे घरांच्या कमतरतेमुळे ही वाढ झाली नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.घरांच्या किंमतवाढीमध्ये हैदराबाद हे सर्वात महागडे शहर ठरले आहे. वर्षभरामध्ये येथील घरांच्या दरांमध्ये ९ टक्क्यांनी वाढ झाली असून, ही देशामध्ये सर्वाधिक आहे. येथे फ्लॅॅटसाठीची प्रतिचौरस फुटाची किमत ५४३४ रुपयांपर्यंत गेली आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अहमदाबादमध्ये घरांचे दर सहा टक्क्यांनी वाढले आहेत. येथील प्रतिचौरस फुटाचे दर ३०३२ रुपये आहेत. पुण्याचा क्रमांक तिसरा लागत असून, तेथील वाढ चार टक्के आहे. येथे प्रतिचौरस फुटासाठीचा दर ५०१७ रुपये एवढा आहे.पुण्यापाठोपाठ क्रमांक लागतो तो बेंगळुरू आणि कोलकात्याचा. या दोन्ही ठिकाणचे दर तीन टक्क्यांनी वाढले आहेत. बेंगळुरू (५२७५ प्रतिचौरस फूट) आणि कोलकाता (४१३४ रुपये प्रतिचौरस फूट) असे येथील दर झाले आहेत. दर वाढण्यामध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा क्रमांक पाचव्या स्थानावर आहे. येथील प्रतिचौरस फुटाचा दर ९४७२ रुपये एवढा आहे. नोएडामध्ये घरांचे दर एक टक्क्याने वाढलेले दिसून येतात. चेन्नईमध्ये मात्र घरांचे दर स्थिर राहिले आहेत. गुरुग्राम हे शहर मात्र या किंमतवाढीला अपवाद ठरले आहे. येथील घरांच्या किमती वर्षभरामध्ये एक टक्क्याने कमी झालेल्या आहेत. सध्या येथील प्रतिचौरस फुटाचा दर ४८९३ रुपयांवर पोहोचला आहे.>कोरोनामुळे सध्या सर्वच व्यवहार ठप्पया अहवालासाठी सर्वेक्षण करताना गेल्या एक वर्षामध्ये केवळ नवीन घरांच्या (फ्लॅट अथवा अपार्टमेंट) किमतीमध्ये झालेली वाढच विचारामध्ये घेण्यात आल्याचे प्रॉप टायगरने जाहीर केले आहे. ज्या घरांची फेर विक्री-खरेदी होते त्यांच्या किमतीमधील वाढ वा घट यामध्ये विचारात घेतलेली नाही. सध्या कोरोनामुळे सर्वच व्यवहार थांबलेले आहेत. मुंबई, पुण्यासह अन्य शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर घरे तयार आहेत. आगामी काळामध्ये त्यात काय बदल होतील, ते आताच सांगता येणार नाही
देशातील प्रमुख शहरांमध्ये वाढल्या घरांच्या किमती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 3:22 AM