लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात वाढलेल्या महागाईचा पुरावाच काँग्रेस नेते आणि थिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांनी शुक्रवारी ट्विटरवर शेअर केला. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकारच्या काळातील किमती आणि चालू महिन्यातील किमती यातील तफावत दाखविणारा एक तक्ता थरूर यांनी लोकांसमोर ठेवला असून, ‘संपुआ आणि रालोआतील आणखी एक तफावत’ असा मथळा त्यांनी या तक्त्यास दिला आहे.
शशी थरूर यांनी ट्विटरवर टाकलेल्या तक्त्यात मोदी सरकार आणि मनमोहनसिंग सरकार यांच्या काळातील तांदूळ, गहू, दूध, तेल आणि भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींतील तफावत दाखवून देतानाच ‘हे तुम्हाला रोज जाणवत आहे’ असे म्हटले आहे.
महागाईच्या वाढीस इंधन दरवाढ प्रामुख्याने कारणीभूत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २२ मार्च आणि ६ एप्रिल या काळात १४ वेळा वाढ झाली. स्वयंपाकाच्या गॅसमध्ये नुकतीच ३.५० रुपयांची वाढ झाल्याने सिलिंडरची किंमत देशभरात १ हजार रुपयांपेक्षा अधिक झाली आहे.
सर्वसामान्यांनी नेमके काय करायचे?
- वाढत्या महागाईने सामान्यांचे जगणे अवघड केले असून, खाद्यपदार्थ, इंधन आणि वीजेच्या दरात वाढ झाल्याने किरकोळ महागाई सतत १३ व्या महिन्यात दुहेरी अंकात आहे.
- किरकोळ महागाईचा दर १५.०८ टक्क्यांवर पोहोचली आहे.
- डिसेंबर १९९८ नंतर प्रथमच महागाई दर १५%वर पोहोचला आहे.
- डिसेंबर १९९८ मध्ये महागाई १५.३२ टक्के होती.
थरूर यांनी जाहीर केलेली महागाई
थरूर यांनी प्रसिद्ध केलेल्या तक्त्यात १ मे २०१४ आणि १ मे २०२२ या दिवशीच्या वस्तूंच्या किमती दिल्या आहेत.
वस्तूचे १ मे २०१४ १ मे २०२२ किमतीतील
नाव सरासरी किंमत सरासरी किंमत तफावत (%)
तांदूळ २६.१७ ३५.८५ ३७ %
गहू २०.५ २८.०१ ३७ %
पीठ (गहू) २२.४१ ३२.०२ ४३ %
चना डाळ ४८.३५ ७२.७४ ५० %
तूर डाळ ६९.०० १०१.९९ ४८ %
उडीद डाळ ६५.०६ १०३.५५ ५९ %
मूगडाळ ८६.६१ १०१.७३ १७ %
मसूरडाळ ६२.७२ ९५.४४ ५२ %
साखर ३६.८३ ४०.५६ १० %
दूध ३५.५३ ५०.७ ४३ %
शेंगदाणा तेल (पाकीटबंद) १२२.०८ १८३.८१ ५१ %
मोहरी तेल (पाकीटबंद) ९५.३९ १८३.१९ ९२ %
वनस्पती (पाकीटबंद) ७३.४७ १६०.१७ ११८ %
सोया तेल (पाकीटबंद) ८४.७५ १६६.५७ ९७ %
सूर्यफूल तेल (पाकीटबंद) ९६.६७ १८८.२२ ९५ %
पामतेल (पाकीटबंद) ७४.५८ १५५.८९ १०९ %
गूळ ३७.४४ ४६.४२ २४ %
सुटा चहा २०५.२८ २८९.६२ ४१ %
मीठ पुडा (आयोडिनयुक्त) १४.९४ १९.६४ ३१ %
बटाटे १७.७२ १९.७४ ११ %
कांदे १७.२४ २२.३५ ३० %
टोमॅटो १८.८९ २९.५ ५६ %