Bonus Share: राइट्स लिमिटेडचे शेअर्स सोमवारी ट्रेडिंगदरम्यान फोकसमध्ये होते. बोनस शेअर्सचा विचार करण्यासाठी बुधवारी (३१ जुलै) संचालक मंडळाची बैठक घेणार असल्याची माहिती कंपनीनं शेअर बाजाराला दिली. याशिवाय २०२४-२५ या आर्थिक वर्षाचं उत्पन्न आणि पहिला अंतरिम लाभांश याचाही बोर्ड विचार करेल. बोनस इश्यूची रेकॉर्ड डेट अद्याप ठरलेली नाही. यापूर्वी २०१९ मध्ये कंपनीने १:४ बोनस इश्यूची घोषणा केली होती.
कोणाला मिळणार फायदा?
जे गुंतवणूकदार एक्स-डेटपूर्वी स्टॉक खरेदी करतील तेच गुंतवणूकदार बोनस शेअर्ससाठी पात्र असतील. जर एखाद्या गुंतवणूकदारानं एक्स-डेटवर किंवा त्यानंतर शेअर्स खरेदी केले तर त्याला बोनस शेअर्स मिळणार नाहीत. राइट्स लिमिटेडचा शेअर शुक्रवारी ०.९९ टक्क्यांनी घसरून ६६८.५० रुपयांवर बंद झाला. गेल्या १२ महिन्यांत हा शेअर ४६ टक्क्यांनी वधारला आहे. पाच वर्षांत हा शेअर १८० टक्क्यांनी वधारलाय. तर २०१८ पासून या शेअरच्या किंमतीत ३३० टक्क्यांनी वाढ झालीये.
कसे होते मार्च तिमाही निकाल?
सार्वजनिक क्षेत्रातील राइट्स लिमिटेडचा एकत्रित निव्वळ नफा ३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत १.५९ टक्क्यांनी कमी होऊन १३६.६७ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १३८.८९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न घटून ६६७.६८ कोटी रुपयांवर आलं होतं. २०२२-२३ च्या याच तिमाहीत तो ७०५.६३ कोटी रुपये होता. समीक्षाधीन कालावधीत खर्च कमी होऊन ४८३.३२ कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ५१४.१७ कोटी रुपये होता. राइट्स ही रेल्वे मंत्रालयांतर्गत एक मल्टिडिसिप्लिनरी इंजिनिअरिंग आणि कन्सल्टिंग संस्था आहे.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)