SIS Success Story : तुम्ही कुठल्याही कॉर्पोरेट ऑफिस किंवा खासगी कंपनीबाहेर निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुरक्षारक्षक पाहिले असतील. यांची भरती कोण करतं माहिती आहे का? तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण ज्या कंपनीचे हे कर्मचारी आहेत, त्यांचं जगभर १२००० कोटी रुपयांचे साम्राज्य आहे. हे सुरक्षा रक्षक रवींद्र किशोर सिन्हा यांनी सुरू केलेल्या देशातील सर्वात मोठ्या खासगी सुरक्षा प्रदाता कंपनीचे कर्मचारी आहेत. सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (SIS) असे या कंपनीचे नाव आहे. त्यांनी ही कंपनी २५० रुपयांमध्ये २ खोल्यांमध्ये सुरू केली होती.
आरके सिन्हा यांनी १९७४ मध्ये पाटणा येथे या कंपनीची पायाभरणी केली. आज त्यांची कंपनी भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये सेवा देत आहे. फोर्ब्सनुसार, आरके सिन्हा यांची सध्याची एकूण संपत्ती ८३०० कोटी रुपये (१ अब्ज डॉलर) आहे. ३६,००० हून अधिक कायम कर्मचारी आणि ३,००० कॉर्पोरेट ग्राहकांसह एसआयएस कंपन्यांना आशिया पॅसिफिक क्षेत्रातील मनुष्यबळ सुरक्षा व्यवसायातील लीडर्स म्हणून ओळखले जाते.
कंपनीचा सर्वाधिक महसूल ऑस्ट्रेलियातून
आरके सिन्हा यांच्या SIS ला ऑस्ट्रेलियातून सर्वाधिक महसूल मिळतो. SIS ने कॅश लॉजिस्टिक सेवा प्रदान करण्यासाठी स्पेनच्या प्रोसेगुरसह संयुक्त उपक्रम सुरू केला आहे. आरके सिन्हा हे केवळ एक यशस्वी उद्योगपती नाहीत तर ते राजकारणी देखील आहेत. सिन्हा हे भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संस्थापक सदस्यांपैकी एक असून ते राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत.
पत्रकार म्हणून काम
पाटण्यातील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या आरके सिन्हा यांनी १९७१ मध्ये राज्यशास्त्रात पदवी मिळवली. कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी एका प्रकाशनात पत्रकार आणि प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले. त्याच दरम्यान भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झाले. यादरम्यान त्यांची बिहार रेजिमेंटच्या सैनिकांशी मैत्री झाली. युद्ध संपल्यानंतर ते १९७३ मध्ये जेपी चळवळीत सामील झाले. त्यामुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले.
सुरक्षा रक्षक कंपनी सुरू केली
नोकरी गमावल्यानंतर, त्यांच्याकडे २ महिन्यांचा २५० रुपये पगार होता. पुढे काय करावं हे कळत नव्हतं. त्यादरम्यान त्यांची बांधकाम व्यवसाय असलेल्या एका मित्राशी भेट झाली. प्रकल्पस्थळाच्या सुरक्षेसाठी माजी सैनिक शोधत असल्याचे त्यांनी सांगितले. सिन्हा यांनी युद्धादरम्यान बिहार रेजिमेंटच्या सैनिकांशी असलेल्या मैत्रीबद्दल सांगितले. तेव्हा त्या मित्राने त्यांना सुरक्षा कंपनी स्थापन करण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर आरके सिन्हा यांनी माजी सैनिकांशी संपर्क साधला. त्यापैकी अनेक जण निवृत्तीनंतर कामाच्या शोधात होते. फेब्रुवारी १९७४ मध्ये पाटणा येथे २ खोल्यांच्या गॅरेजमध्ये SIS ची स्थापना करण्यात आली. त्यांनी बिहार रेजिमेंटमधील त्यांच्या संपर्कांना भेटून सेवानिवृत्त जवानांची माहिती घेतली. त्यांना काम करण्यास पटवून दिले. SIS ची स्थापना झाल्यानंतर एका वर्षात कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या २५०-३०० पर्यंत वाढली आणि उलाढाल १ लाख रुपयांच्या पुढे गेली.
कंपनीचा महसूल १२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त
गेल्या वर्षी आरके सिन्हा यांनी सांगितले होते की त्यांच्या कंपनीत २८४००० पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. SIS समूहाचा आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा महसूल (FY24 मध्ये SIS महसूल) १२२६१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे आणि एबिटा ५८५ कोटी रुपये झाला आहे.