कॅम्पा कोलाचा देशभरात प्रसार करण्यासाठी रिलायन्स रिटेल विविध कंपन्यांशी करार करत आहे. मुकेश अंबानींनी कॅम्पा कोलाची व्याप्ती वाढवण्यासाठी मोठी योजना आखली आहे. यावेळी त्यांनी श्रीलंकेच्या सिलोन बेव्हरेजेस इंटरनॅशनल कंपनीसोबत भागीदारी केलीये. सिलोन बेव्हरेजेस इंटरनॅशनलची मालकी जगप्रसिद्ध फिरकीपटू आणि श्रीलंकेचा माजी खेळाडू मुथय्या मुरलीधरनकडे आहे. या करारामुळे कॅम्पा कोलाच्या विस्तारात मदत होणार आहे. कॅम्पा कोलाची बाजारपेठ विस्तारणार आहे. त्यामुळे कोका कोला आणि पेप्सी यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. आधीच रिलायन्सच्या प्राइस वॉरमुळे या कोल्ड्रिंक कंपन्यांचं टेन्शन वाढलं आहे.
काय आहे अंबानींचा प्लॅन?
रिलायन्स रिटेलने कॅम्पा कोलासाठी कॅनच्या को-पॅकिंगसाठी सिलोन बेव्हरेजेस इंटरनॅशनलशी करार केला आहे. याशिवाय दोन्ही कंपन्यांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिट स्थापन करण्यासाठी करारही झाला आहे. येथे सिलोन बेव्हरेजेस इंटरनॅशनलच्या काही ब्रँड्सचे वितरण हक्क रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सकडे (RCPL) जाण्याची शक्यता आहे. श्रीलंकेतील सर्वात मोठी बेवरेज कॅन आणि फिलिंग कंपन्या कॅम्पा कोलासाठी पॅकिंग करणार आहेत.
का आहे ही डील खास?
सिलोन बेव्हरेजेसचा श्रीलंकन प्लांट हा सर्वात मोठ्या बेवरेज कॅन आणि फिलिंग कंपन्यांपैकी एक आहे. याची क्षमता ३०० मिलियन बेवरेज कॅन फिलिंगची आहे. सिलोन बेव्हरेजेस जगभरातील शीतपेय कंपन्यांना कॅन पुरवते. कंपनीचं प्रति तास उत्पादन ४८००० कॅन पेक्षा जास्त आहे. या डीलचा रिलायन्स रिटेल व्हेंचर्सला मोठा फायदा होणार आहे. कंपनी लहान आणि मध्यम आकाराच्या वितरकांपर्यंत वेगाने पोहोचू इच्छित आहे. कंपनीची थेट टक्कर कोका-कोला आणि पेप्सिको सारख्या मोठ्या खेळाडूंशीदेखील आहे. या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी कॅम्पा कोलाला आपलं नेटवर्क आणि पुरवठा वाढवावा लागेल. या करारामुळे रिलायन्स मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकणार आहे.
रिलायन्सला काय फायदा?
या करारानंतर रिलायन्सला त्यांचं वितरण वाढवण्यात मदत होणार आहे. या करारामुळे कॅम्पा कोलाला लहान आणि मध्यम आकाराच्या वितरकांपर्यंत जलद पोहोचण्यास मदत होईल. कॅम्पा कोलाची व्याप्ती वाढेल. २०२२ मध्ये रिलायन्स रिटेलनं प्युअर ड्रिंक्स ग्रुपकडून २२ कोटींना कॅम्पा कोला विकत घेतला होता.