Join us

रोबोंवरही कर लावायला हवा

By admin | Published: February 21, 2017 12:15 AM

मानवी रोजगार पळविणाऱ्या यंत्र मानवांवर (रोबो) कर बसवायला हवा, असे प्रतिपादन मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स

वॉशिंगटन : मानवी रोजगार पळविणाऱ्या यंत्र मानवांवर (रोबो) कर बसवायला हवा, असे प्रतिपादन मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी केले आहे.क्वार्ट्झ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत गेट्स यांनी म्हटले की, स्वयंचलित यंत्रांद्वारे होणाऱ्या कामांवर कर लावण्याची गरज आहे. कारखान्यात काम करून ५0 हजार डॉलर कमावणाऱ्या कामगाराकडून आयकर, सामाजिक सुरक्षा कर असे अनेक कर वसूल केले जातात. या कामगाराच्या जागी कारखान्यात येऊन यंत्र काम करीत असेल, तर त्याच्यावरही कामगाराप्रमाणेच कर लावण्यात यायला हवा.जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींत गणना होणाऱ्या गेट्स यांनी सांगितले की, माणसांच्या ऐवजी स्वयंचलित यंत्रांद्वारे काम करून घेणाऱ्या कंपन्यांवर कर लावायला हवा, असे मला वाटते.  अशा करामुळे यांत्रिकीकरणाची गती हंगामी स्वरूपात का होईना कमी होईल. तसेच अन्य स्वरूपाच्या रोजगार निर्मितीसाठी निधीही  उपलब्ध होईल.गेट्स म्हणाले की, यंत्रमानव करामुळे उपलब्ध होणारा पैसा वृद्धांची काळजी घेण्याच्या क्षेत्रात रोजगार निर्माण करण्यासाठी अथवा लहान मुलांच्या शाळांसाठी वापरता येईल. या क्षेत्राला पैशांची प्रचंड गरज आहे. तथापि, ती पूर्ण होत नाही. सरकारने केवळ व्यवसायावर अवलंबून राहण्यापेक्षा अशा उपक्रमांकडे लक्ष द्यायला हवे.  अत्यल्प उत्पन्न असलेल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारखान्यांत यंत्रे आल्यामुळे लोक बेरोजगार होतात. हे लोक नंतर अशा छोट्या-मोठ्या ठिकाणी कामे करतात. त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे. (वृत्तसंस्था)