नवी दिल्ली : पेन उत्पादक रोटोमॅक समूहाचा कर्ज घोटाळा उघडकीस आला असतानाच, या कंपनीने करचोरी केल्याचेही समोर येत आहे. या प्रकरणी आयकर खात्याकडून १४ बँक खाती गोठविण्यात आली आहेत. यातील बहुतांश खाती उत्तर प्रदेशातील विविध बँक शाखांतील आहेत.एका वरिष्ठ प्राप्तिकर अधिका-याने ही माहिती दिली. तो म्हणाला की, थकीत कर मागण्या पूर्ण करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात बँक खाती जप्त करण्याची कारवाई रोटोमॅक समूहाविरुद्ध करण्यात आली आहे. कंपनीकडे सुमारे ८५ कोटी रुपयांचा कर थकल्याची माहिती आहे. कंपनीची ३ बँक खाती गेल्या महिन्यातच प्राप्तिकर विभागाने जप्त केली होती.कानपूरस्थित उद्योग समूहाने ३,६९५ कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केल्याचे नुकतेच उघडकीस आले असून, या प्रकरणी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. रोटोमॅक ग्लोबल प्रा. लि. ही कंपनी, तसेच कंपनीचे संचालक विक्रम कोठारी, त्यांची पत्नी साधना कोठारी आणि मुलगा राहुल कोठारी यांच्याविरुद्ध सीबीआयने फौजदारी तक्रार दाखल केली आहे. बँक आॅफ बडोदाच्या काही अज्ञात अधिकाºयांवरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सोमवारी त्यांच्याविरोधात छापेमारीही करण्यात आली होती.मोदी सरकारच्या काळात उघड झालेला हा दुसरा मोठा बँक घोटाळा ठरला आहे. या आधी अब्जाधीश ज्वेलरी डिझायनर नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसी यांनी पंजाब नॅशनल बँकेत केलेला ११,४00 कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे.नीरव मोदीने घडविलेल्या घोटाळ्यातील रक्कम ३0 हजार कोटींपेक्षा जास्त असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.बँक आॅफ बडोदाने दिलेल्या तक्रारीनुसार, रोटोमॅक कंपनी समूहाने बँक समूहास ३,६९५ कोटी रुपयांना फसविले आहे. कर्ज घेऊन त्याची परतफेड केलेली नाही. यात २,९१९ कोटी रुपयांचे मुद्दल कर्ज असून, उरलेली रक्कम रक्कम व्याजाची आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कंपनीविरुद्ध मनी लाँड्रिंगच्या आरोपाखालीही गुन्हा नोंदविला आहे. बँकांकडून कर्जाच्या स्वरूपात घेण्यात आलेला पैसा अन्यत्र वळविण्यात आला आहे का, याचा तपास ईडी करणार आहे. आरोपींनी काही बेकायदेशीर मालमत्ता आणि काळा पैसा जमविला आहे का, याचाही तपास केला जाणार आहे.
रोटोमॅक घोटाळा : कोठारीच्या १४ खात्यांवर टाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 3:08 AM